नवी दिल्ली - देशभरात कोरोना विषाणूने हाहाकार माजवला आहे. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. आतापर्यंत भारतात कोरोनामुळे 420 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर देशभरात तब्बल 12 हजार 759 रुग्ण कोरोनाबाधित आढळले आहेत. केंदीय आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे.
आरोग्य मंत्रालयाने सांगितले, की कोरोनाच्या 10 हजार 824 रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. 1 हजार 515 लोक बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर, एक विदेशी नागरिक आपल्या देशात परत गेला आहे. या सर्व रुग्णांमध्ये 76 विदेशी नागरिकांचा समावेश आहे.
मंत्रालयाने माहिती दिली, की बुधवारपासून देशात 22 लोकांचा मृत्यू झाला आहे. यात महाराष्ट्रातील 9, आंध्रप्रदेशातील 5, गुजरातमधील 3, दिल्ली आणि तमिळनाडूमधील प्रत्येकी 2, तर कर्नाटकातील एकाचा समावेश आहे.
तमिळनाडू आणि आंध्रप्रदेशात प्रत्येकी 14, पंजाबमध्ये 13, कर्नाटकमध्ये 12, उत्तर प्रदेशमध्ये 11, पश्चिम बंगालमध्ये सात, जम्मू काश्मिरमध्ये 4, केरळ आणि हरियाणामध्ये प्रत्येकी 3, तर झारखंडमध्ये दोघांचा आतापर्यंत मृत्यू झाल्याचे आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे.