दिल्ली - कोरोना विषाणूचा जगभरात प्रादुर्भाव वाढत असून रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने अनेक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. गृह मंत्रालयाने पद्म पुरस्कार वितरण सोहळा स्थगित केला असून पुढील तारीख जाहीर करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते राष्ट्रपती भवनात येत्या 3 एप्रिलला पद्म पुरस्काराचे वितरण होणार होते. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारकडून पद्मविभूषण, पद्मभूषण सोबत पद्मश्री पुरस्काराची घोषणा करण्यात आली होती. देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कारांनी एकूण 141 जणांना गौरवण्यात येणार होते.
दरम्यान, दरवर्षी राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा व अन्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना पद्म पुरस्कार देऊन गौरव करण्यात येते. पद्म पुरस्कार भारतरत्न पुरस्कारानंतर प्रतिष्ठेचा मानला जातो. पद्मविभूषण पुरस्कारासाठी 7 , पद्मभूषण पुरस्कारासाठी 16 तर पद्मश्री पुरस्कारासाठी 118 जणांची निवड केली होती.