कोरबा (छत्तीसगड): राज्यातील कोरबा जिल्ह्यातील कटघोरा हे गाव कोरोना विषाणूचे हॉटस्पॉट बनले आहे. रविवारी 4 जणांचा कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. यानंतर त्यांना एम्स दाखल करण्यात आले. कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीने रुग्णालयात जात असतानाचे फोटो आणि एक पोस्ट फेसबुकवर शेअऱ केली आहे. त्याच्या फेसबुक पोस्ट आणि कॉमेंटबाबत सोशल मीडियावर तर्क वितर्क लावले जात आहेत.
कोरोनाबाधिताने फेसबुकवर हमारी तो बल्ले बल्ले म्हणत पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्याने सरकारने टेस्ट केल्याबद्दल आभार मानले आहेत. कोरोनाबाधित रुग्णांना चांगल्या सुविधा मिळत आहेत. मात्र, ज्यांची कोरोना टेस्ट झाली नाही त्यांची काळजी वाटते, असे त्याने म्हटले आहे.
कोरोनाबाधित रुग्णाच्या फेसबुक पोस्टचा अर्थ
कोरोनाबाधित रुग्णाने फेसबुकवर टाकलेल्या पोस्टचे वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत. कोरोनाचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेला व्यक्ती प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसोबत होता, अशी माहिती समोर येत आहे. कोरोना चाचणीसाठी नमुने घेण्यासाठी गेलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सोबत तो फिरत होता. ही व्यक्ती जवळपास शंभर लोकांच्या संपर्कात आल्याची माहिती आहे. फेसबुकवर पोस्ट करणाऱ्या या व्यक्तीच्या कुटुंबाला घरामध्ये विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.
आरोग्य विभागाची करत होता मदत
कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीने लोकांच्या घरोघरी जाऊन नमुने गोळा करण्यासाठी मदत केली आहे. हे त्याने फेसबुक पोस्टवरील कॉमेंटला दिलेल्या रिप्लायवरुन स्पष्ट होते. कटघोरामध्ये 700 लोकांच्या कोरोना टेस्ट केल्या आहेत असे तो सांगतो आणि कोरोना पॉझिटिव्ह होऊन आता मी एम्समध्ये पोहोचलोय, जगलो तर पुन्हा भेटू असेही तो म्हणतो.