नवी दिल्ली - भारतात गेल्या 24 तासांत कोरोना संसर्गात मोठी वाढ झाली आहे. गेल्या दिवसभरात तब्बल 9 हजार 987 कोविड-19चे नवे रुग्ण सापडले आहेत. तर, मागील 24 तासांत 331 कोरोना बाधितांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाने ही माहिती दिली.
देशातील कोरोना संसर्गाची स्थिती गंभीर बनली आहे. आत्तापर्यंत देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 2 लाख 66 हजार 598 वर पोहोचला आहे. यापैकी एक लाख 29 हजार 215 जण बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले आहे किंवा ते इतर ठिकाणी स्थलांतरित झाले आहेत. सध्या देशात एक लाख 29 हजार 917 अॅक्टिव्ह केसेस असल्याची नोंद आहे. तर, मृतांचा आकडा सात हजार 466वर पोहोचला आहे, असे मंत्रालयाने सांगितले.
जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. भारतातही कोविड -19चे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांद्वारे विविध उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र प्रचंड लोकसंख्येवर नियमांचे बंधन तसेच निर्बंध लावून ते यशस्वी करणे आणि लोकांमध्ये जागरुकता होणे, याद्वारे रोगप्रसार आटोक्यात येणे अवलंबून आहे. यावर सर्व पातळ्यांवर जोरदार प्रयत्न सुरू आहेत.
याशिवाय, डॉक्टरांना, पोलिसांना आणि इतर आवश्यक आरोग्यसेवा पुरवणाऱ्यांना होणारा कोरोनासंसर्ग ही चिंतेची बाब ठरत आहे. तसेच, कोरोना प्रसार रोखण्यासाठी देशभरात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्थेत आलेली तूट भरून काढणे, हेही आव्हान देशासमोर आहे.