नवी दिल्ली - देशभरात मागील चोवीस तासांत 43 हजार 893 नवे रुग्ण सापडल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. यामुळे देशात आतापर्यंत सापडलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 79 लाख 90 हजार 322 वर गेली आहे. नव्याने रुग्ण सापडलेल्या राज्यांचा संपूर्ण देशातील रुग्णसंख्येत 79 टक्के वाटा आहे. यामध्ये केरळ, महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, दिल्ली, पश्चिम बंगाल, कर्नाटक, तामिळनाडू, छत्तीसगड उत्तरप्रदेश आणि राजस्थान तसेच केंद्रशासित प्रदेशांचा समावेश आहे.
दिल्ली
दिल्लीचे शिक्षण मंत्री मनिष सिसोदिया यांनी बुधवारी केलेल्या घोषणेनुसार राजधानीतील सर्व शाळा- महाविद्यालये पुढील निर्णयापर्यंत बंद राहणार आहेत. मार्च महिन्यात कोरोनाचा प्रसार वाढल्यापासून म्हणजेच लॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्यात शाळा बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे अद्याप सर्व शाळांना कुलूप आहे,
केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना कोरोनाची लागण झाली आहे. याबाबत त्यांनी ट्वीटरवर माहिती दिली असून त्यांच्या संपर्कात आलेल्यांना कोरोना चाचणी करण्याचे सुचवले आहे.
महाराष्ट्र
राज्यभरातील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात येत असल्याने महाराष्ट्रात हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. मुंबई उपनगरातील रेल्वेसेवा सर्वांसाठी सुरू करण्यात येत आहे. टप्प्याटप्प्याने ही सेवा पूर्ववत होणार आहे. यासंबंधी पश्चिम रेल्वे, मध्य रेल्वेच्या संचालकांना राज्य सरकारने प्रस्ताव दिले आहेत. त्यानुसार गर्दीची वेळ नसताना अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त सामान्य व्यक्तींना देखील यापुढे लोकलने प्रवास करता येणार आहे.
उत्तरप्रदेश
तळीरामांसाठी आनंदाची बातमी आहे. यापुढे उत्तरप्रदेशातील सर्व दारूची दुकानं सकाळी १० ते रात्री १० पर्यंत सुरू होणार आहेत. राज्य उत्पादनशुल्क विभागाने दिलेल्या परवानगीनुसार कोरोना कंटेन्मेंन्ट झोन्सच्या बाहेरील दुकानांना ही मुभा असणार आहे. लॉकडऊनमध्ये बंद असलेली दारुची दुकानं ४ मे रोजी उघडण्याची परवानगी योगी सरकारने दिली होती. मात्र संध्याकाळी ७ पर्यंतच परवानगी देण्यात आली होती. आता यावरील निर्बंध उठवण्यात आले आहेत.
केरळ
आज पुन्हा राज्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. मागील चोवीस तासात केरळमध्ये 8 हजार 790 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. बुधवारी एकूण 66 हजार 980 जणांच्या चाचण्या पार पडल्या. मागील दोन आठवड्यांपासून राज्यातील रुग्ण वाढीचा वेग 13 ते 14 टक्क्यांवर गेला आहे. सार्वजनिक आरोग्य मंत्री केके शैलजा यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 93 हजार 264 वर गेली आहे. तसेच आत्तापर्यंत 3 लाख 16 हजार 692 जणांना डिस्चार्ज मिळाला आहे.
तेलंगणा
तेलंगणात बुधवारी 1 हजार 481 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले असून राज्यातील एकूण रुग्णांची संख्या 2 लाख 34 हजार 152 झाली आहे. मागील काही दिवसांपासून राज्यात दररोज एक हजाराहून कमी रुग्ण सापडत होते. मात्र गेल्या चार दिवसांपासून हा आकडा 1 हजार 400 च्या जवळपास गेला आहे. नुकतेच 40 हजार 81 जणांच्या चाचण्या केल्याने रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे. मागील चोवीस तासांत राज्यात चौघांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत एकूण एक हजार 319 जणांचा मृत्यू झाला आहे.