गांधीनगर - गुजरातमध्ये कोरोना हॉटस्पॉट भाग सील करण्यास गेलेल्या पोलिसांवर जमावाने हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात एक पोलीस अधिकारी जखमी झाला आहे. गोध्रा जिल्ह्यामध्ये काल(गुरुवार) सायंकाळी ही घटना घडली.
दगडफेकीत पोलीस निरिक्षक एम. पी पांड्या जखमी झाले आहेत. जहुर मार्केटशेजारील गुह्या मोहल्ल्यात ही घटना घडली. जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी अश्रुधुराच्या कांड्यांचा वापर करण्यात आला. त्यानंतर जमाव नियंत्रणात आला असून एका व्यक्तीला अटक करण्यात आल्याचे पांड्या यांनी सांगितले.
गोध्रा शहरात आत्तापर्यंत २२ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे परिसर कंन्टेनमेंट करण्यात येत आहे. त्यानुसार या परिसरामध्ये कडक निर्बंध असणार आहेत. याला नागरिकांनी विरोध केला. या घटनेचे व्हिडिओही व्हायरल होत आहेत. पोलिलांचा पाठलाग करताना तसेच दगडफेक करताना नागरिक दिसून येत आहेत. गुजरात राज्यात ४ हजारांपेक्षा अधिक कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत.