जयपूर : राजस्थानच्या झालावाड जिल्ह्यामध्ये अचानक पसरलेल्या बर्ड फ्लूमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरात आतापर्यंत शेकडो कावळ्यांचा यामुळे मृत्यू झाला असून, जिल्हा प्रशासनाने आता रॅपिड रिस्पॉन्स पथकाला पाचारण केले आहे.
कारवाई समितीची स्थापना..
झालावाडचे जिल्हाधिकारी निकया गोहाएन यांनी त्वरीत एका कारवाई समितीची स्थापना केली आहे. यामध्ये वनविभागाचे उप वन संरक्षक, एसडीएम, पोलीस उप अधीक्षक, पशुपालन विभागाचे सहसंचालक, मुख्य वैद्यकीय आणि आरोग्य अधिकारी, तसेच नगर परिषदेचे आयुक्त यांचा समावेश आहे.
पशुपालन विभागामार्फत सध्या राडी भागातील बालाजी परिसरात सर्वेक्षण केले जात आहे. तसेच, आजूबाजूच्या सर्व पोल्ट्री फार्म्समध्ये सॅम्प्लिंग करण्यात येत आहे. यासोबतच, नगर परिषदेकडून बालाजी परिसरात सॅनिटायझेशन करण्यात येत आहे. प्रशासनाने या परिसरातील सर्व पोल्ट्री फार्म आणि अंड्यांच्या दुकानांना बंद करण्याचा निर्णय घेतला असून, या अंड्यांचीही चाचणी करण्यात येत आहे.
परिसरात कर्फ्यू..
जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नागरिकांच्या सुरक्षेसाठी खबरदारी म्हणून बालाजी परिसराच्या एक किलोमीटर भागात कर्फ्यू लावण्यात आला आहे. गेल्या २५ डिसेंबरपासून या परिसरातील शेकडो कावळ्यांचा अचानक मृत्यू होताना दिसून आला. त्यानंतर त्यांचे नमुने चाचणीसाठी पाठवल्यानंतर या भागात एवियन इन्फ्लुएंझा या आजाराचा प्रसार झाल्याचे समजले. यानंतर हा आजार पसरु नये यासाठी जिल्हा प्रशासन युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे.
हेही वाचा : दिल्ली गारठली..! तापमान १.१ अंशावर