नवी दिल्ली - काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आज पक्षाच्या जाहीरनाम्याची घोषणा करणार आहेत. यावेळी अनेक राज्यातील मुख्यमंत्री आणि पक्ष कार्यकर्ते उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यासाठी नवी दिल्ली येथील पक्ष मुख्यालयात मोठी तयारी करण्यात आली आहे. सकाळी साडे ११ वाजेपर्यंत जाहीरनामा प्रसिद्ध होऊ शकतो.
यावेळी यूपीए अध्यक्ष सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, पक्ष महासचिव प्रियांका गांधी वॉड्रा, पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरेंद्र सिंग, मध्यप्रशचे मुख्यमंत्री कमलनाथ, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुड्डा आणि दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शिला दीक्षित उपस्थित राहणार आहेत. घोषणापत्राची थिम 'अन्याय से न्याय' ठेवण्यात आली आहे.
या घोषणांचा समावेश होण्याची शक्यता -
- काँग्रेस सत्तेत आले तर किमान उत्पन्न सहाय्य योजना (न्याय) लागू करण्यात येईल. या अंतर्गत देशातील ५ कोटी कुटुंब किंवा २५ कोटी व्यक्तींना ७२ हजार रुपये वार्षिक देण्याची घोषणा करण्यात आली आहे. ही रक्कम गृहिणिंच्या बँक खात्यांमध्ये वटवली जाणार आहे. तर महिन्याला १२ हजार रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या गरीब कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळेल. काँग्रेस या योजनेला 'गरीबी हटाओ' योजना असल्याचे म्हणत आहे.
- देशातील बेरोजगार २२ लाख युवकांना एका वर्षात नोकऱ्या देण्याची घोषणाही काँग्रेसने केली आहे. या नोकऱया देशभरातील विविध विभागात रिक्त असणारे पदांवर देण्यात येणार आहेत, असे काँग्रेसने आधिच स्पष्ट केले आहे. हे पद एनडीए आणि भाजपच्या कार्यकाळात भरण्यात आलेले नाहीत. काँग्रेस सत्तेत आली तर ३१ मार्च २०२० वपर्यंत हे सर्व पद भरले जाणार.
- मुस्लिम समुदायाला आकर्षित करण्यासाठी काँग्रेस ट्रिपल तलाक मुद्यावर मोठे काम करत आहे. त्यासाठी अनेक मुस्लिम कुटुंबियांचे त्यांनी सूचना मागवून घेतल्या आहेत. त्यावरुन या कायद्यात सुधारणा करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न राहील.
- महिलांवर होणाऱ्या अपराधांवर आळा घालण्यासाठी एक त्वरित कार्यबल निर्माण करण्यावर काँग्रेसचा जोर आहे. महिलांना संसद आणि विधानसभांमध्ये ३३ टक्के आरक्षण देण्यावरही काँग्रेस विचार करत आहे.
- शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांवर चांगले हमीभाव मिळावे यासाठी काँग्रेसने योजना तयार केली आहे. आत्तापर्यंत आपल्या देशात विश्व स्तराच्या बाजारपेठेचा अभाव आहे. मध्यस्थ शेतकऱ्यांकडून पिक खरेदी करून देश-विदेशात पोहोचवतात. काँग्रेस शेतकऱ्यांसाठी विश्व स्तराच्या बाजारपेठेची निर्मिती आणि तंत्रज्ञान आणण्याच्या तयारीत आहे. ज्यामुळे शेतकरी सरळ वैश्विक स्तरावार आपले पिक विकू शकणार आहे. त्यासाठी काँग्रेसने कार्ययोजनाही तयार केली आहे.
- काँग्रेस निती आयोगाला संपवून योजना आयोग पुन्हा बहाल करण्याच्या तयारीत आहे. निती आयोग पंतप्रधानांच्या बाबतीत खोटे आकडे जाहीर करते, असा काँग्रेस अध्यक्षांचा आरोप आहे. त्यासाठी योजना आयोग पुन्हा स्थापन करण्यावर काँग्रेसचा जोर असेल.
- देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी आरबीआयच्या कार्यपद्धतीत बदल करण्याची काँग्रेसची तयारी आहे. त्यासाठी आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन आणि मोठ्या अर्थशास्त्रींसोबत मिळून त्यांनी एका योजना आखलेली आहे. आरबीआय जवळ जमा असलेल्या फंडवरही ही योजना विशेष लक्ष ठेवणार आहे. तर, जीएसटीमध्ये मोठा बदल करण्याच्या तयारीत काँग्रेस आहे.
- देशातील जनता निरोगी आणि सुदृढ रहावे यासाठी आरोग्य सेवेवर काँग्रेस विशेष लक्ष ठेऊन आहे. ज्या प्रमाणे जनतेकडे माहितीचा अधिकार आणि शिक्षणाचा अधिकार त्याच तत्वांवर आधारीत आरोग्याचा अधिकारही काँग्रेस देणार आहे. आयुष्यमान योजना रद्द करुन त्या जागी दुसरी योजना आणण्याची काँग्रेसची तयारी आहे.
- छोट्या व्यापाऱ्यासाठी सहज कर्ज मिळावे म्हणून काँग्रेस अनेक तयारी करत आहे. यामध्ये नवीन उद्योगांना ३ वर्षापर्यंत कोणत्याही नियमांची गरज राहणार नाही. स्टार्टअप करणाऱ्या व्यापाऱ्यांसाठी एँजन टॅक्स रद्द करण्यात येईल.
- राजीव गांधी रिसर्च फेलोशिपचे परिघ वाढवून ग्रामिण स्तरापर्यंत आणण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असेल. मॉब लिंचिंग सारख्या घटनांना थांबवण्यासाठी काँग्रेस कठोर कायदा आणणार आहे.