नवी दिल्ली : एखाद्या पदावर नेमणूक करणाऱ्या उमेदवारापेक्षा, निवडून गेलेला उमेदवार अधिक योग्य असतो. जर पक्षांतर्गत निवडणुका नाहीत झाल्या, तर पुढील ५० वर्षे काँग्रेसला विरोधी पक्षात बसावे लागेल, असे मत काँग्रेसचे वरिष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी व्यक्त केले आहे. सोनिया गांधी यांची काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षपदी निवड झाल्याच्या तीन दिवसांनंतर त्यांनी आपले मत व्यक्त केले आहे. पक्षात अगदी जिल्हाध्यक्ष, राज्य प्रमुख किंवा कार्यकारिणी सदस्य या पदांसाठीही नेमणुकांऐवजी निवडणुका व्हाव्यात असे ते यावेळी म्हटले.
जेव्हा तुम्ही निवडणुका घेता, तेव्हा निवडून आलेल्या नेत्याला पक्षातील किमान ५१ टक्के नेत्यांचा पाठिंबा आहे, असे स्पष्ट होते. नेमणूक केलेल्या अध्यक्षाला पक्षातील एक टक्के तरी नेत्यांचा पाठिंबा आहे का, हेही तपासून पाहता येत नाही. नेमणूक केलेल्या उमेदवाराला पदावरून काढून टाकता येते, मात्र निवडणुकांद्वारे निवडून जाऊन झालेल्या उमेदवाराला पदावरुन काढता येत नाही. शिवाय, त्या पदाच्या शर्यतीत असणारे इतर नेतेही पुढील निवडणुकीमध्ये तरी आपण विजय मिळवू, असा विचार करुन अधिक जोमाने काम करतात. त्यामुळे पक्षाचीच प्रगती होते.
निवडणुकांना विरोध करणारे नेते हे आपण पक्षनिष्ठ असल्याचा कांगावा करत आहेत. खरेतर आतापर्यंत खालच्या दर्जाचे राजकारण करत ते वर आले आहेत, आणि त्यांना माहिती आहे की निवडणुका झाल्यास त्यांना पक्षातील पद गमवावे लागेल असे म्हणत आझाद यांनी पक्षातील इतर नेत्यांवर टीका केली. गेल्या कित्येक दशकांमध्ये पक्षात निवडणुका झाल्या नाहीत, ज्याचे परिणाम आपण पाहतच आहोत. आपण जवळपास सर्व निवडणूका हरत चाललो आहोत. जर पुढची ५० वर्षे विरोधी पक्षातच बसण्याची इच्छा असेल तर पुढेही पक्षात निवडणुका झाल्या नाहीत तरी चालतील. ज्या लोकांना खरोखरच पक्षाची वाढ करायची आहे, पक्षाला पूर्वस्थितीत आणायचे आहे ते नक्कीच निवडणुका घेण्याच्या विचाराला पाठिंबा देत असावेत, असे ते म्हणाले.
निवडणुका व्हाव्यात या मागणीमध्ये माझा कसलाही स्वार्थ नाही. मी एकदा मुख्यमंत्री झालो आहे, केंद्रीय मंत्रीमंडळातही होतो, तसेच कार्यकारिणीचा सदस्य आणि सर्वसाधारण सचिवही होतो. पुढील पाच ते सात वर्षे मी सक्रिय राजकारणात नसणार आहे. निवडणुकांची मागणी मी पक्षाच्या बळकटीसाठी करत आहे, आणि ती रास्त आहे असे आझाद यावेळी म्हणाले.
काँग्रेसला पक्षाला पूर्णवेळ अध्यक्ष हवा, आणि संघटनात्मक पातळीवर सुधारणा हव्यात अशी मागणी करणारे पत्र काँग्रेसच्या २३ वरिष्ठ नेत्यांनी सोनिया गांधींना लिहीले होते. यामध्ये गुलाम नबी आझाद यांचाही समावेश होता. यासंदर्भात २४ ऑगस्टला काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक पार पडली. कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये पक्षातील नेतृत्त्वावर टीका करणाऱ्या नेत्यांनी, आपण केवळ पक्षासमोरील आव्हाने समोर यावीत, त्यांच्यावर लक्ष जावे यासाठी सोनिया गांधींना पत्र लिहिल्याचे स्पष्ट केले. यानंतर अध्यक्षपदाची निवडणूक होईपर्यंत सोनिया गांधीच पक्षाच्या अंतरिम अध्यक्ष असतील असा निर्णय घेण्यात आला होता.