कानपूर- भाजपच्या केंद्रीय मंत्री साध्वी निरंजन ज्योती यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. काँग्रेसने केलेले वक्तव्य पाकिस्तानमध्ये हेडिंग बनते, अशी टीका त्यांनी केली आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांच्याकडे काश्मीर विषय असता तर तो प्रश्न केव्हाच सुटला असता, असेही त्या म्हणाल्या आहेत. कानपूर जिल्ह्यातील घाटमपूर येथे भाजप सदस्यता अभियानात त्या पत्रकारांशी बोलत होत्या.
काँग्रेसने संसदेत 370 अनुच्छेद काढण्यावरुन विरोध केला होता. काँग्रेस काश्मीरमधील लोकांना भडकवण्याचे काम करत आहे, असा आरोप निरंजन ज्योती यांनी केला. काँग्रेसच्या काही समजदार लोकांनी भाजपच्या अनुच्छेद 370 हटवण्याच्या निर्णयाचे स्वागत केले, असेही त्या म्हणाल्या.
काश्मीरमध्ये पूर्वी कोणतीही मोठी घटना घडली की दगडफेक करत लोक रस्त्यावर उतरता दिसायचे. मात्र, यावेळी तेथील लोकांनी आनंद व्यक्त केला आहे. त्यामुळे काश्मीरमध्ये शांतता आहे, असेही त्या म्हणाल्या आहेत.
मोदी सरकारने जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे अनुच्छेद 370 हटवल्याने संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. भाजपकडून या निर्णयाचे जोरदार स्वागत होत असले तरी काँग्रेसने मात्र हा निर्णय असंवैधानिक असल्याचे म्हटले आहे.