जयपूर - भ्रष्ट मार्गाने भारतीय जनता पार्टी राजस्थानमधील काँग्रेस सरकार पाडण्याचे प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसच्या आमदारांनी केला आहे. याबाबत राजस्थान काँग्रेसकडून शुक्रवारी उशिरा रात्री एक पत्र प्रसिध्द करण्यात आले असून यावर २४ आमदारांची सही आहे.
काय आहे काँग्रेसच्या पत्रात -
भाजपचे काही वरिष्ठ नेते काँग्रेसच्या आमदारांशी संपर्क साधत आहेत. यात ते पैशाचे तसेच इतर काही बाबीचे अमिष दाखवत आहेत. याची माहिती आम्हाला आहे. ते राज्यातील सरकार पाडू इच्छित आहेत. पण आम्ही त्यांचे मनसुबे कधीच पूर्ण होऊ देणार नाही. काही दिवसांपूर्वीच राज्यसभेची निवडणूक पार पडली. यातही त्यांनी भ्रष्ट मार्गाचा वापर करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांचे हे षडयंत्र काँग्रेस, बीटीपी, आरडी आणि अपक्ष आमदारांनी हाणून पाडला. यातून भाजपने धडा घेतलेला दिसत नाही. ते अजूनही लोकांनी निवडून दिलेल्या सरकारला पाडण्याचे प्रयत्न करत आहेत.
आमचे सरकार यशस्वीपणे ५ वर्ष पूर्ण काम करेल. यानंतर आम्ही केलेल्या या ५ वर्षातील कामाच्या जोरावर २०२३ मध्येही सरकार स्थापन करु, असा विश्वास काँग्रेसच्या नेत्यांनी बोलून दाखवला.
पत्रात 'या' आमदारांची नावे आहेत -
लाखन सिंह मीणा, जोगेंद्र सिंह अवाना, मुकेश भाकर, इंदिरा मीणा, वेद प्रकाश सोलंकी, संदीप यादव, गंगा देवी, हाकम अली, वाजिब अली, बाबूलाल बैरवा, रोहित बोहरा, दानिश अबरार, चेतन डूडी, हरीश मीणा, रामनिवास गावडिया, जाहिदा खान, अशोक बैरवा, जोहरी लाल मीणा, प्रशांत बैरवा, शकुंतला रावत, राजेंद्र सिंह बिधूडी, गोविंद राम मेघवाल, दीपचंद खेरिया आणि राजेंद्र सिंह गुढ़ा. याशिवाय राजस्थानचे महेश जोशी आणि महेंद्र चौधरी यांचे नाव देखील या पत्रात आहे.
हेही वाचा - गुजरात: कोरोना 'पॉझिटिव्ह' आल्यानंतर व्यापाऱ्यानं रेल्वेसमोर उडी मारून संपवलं जीवन
हेही वाचा - VIDEO : निर्धास्तपणे फिरत होता विकास दुबे; मंदिरातील सीसीटीव्ही फुटेज आले समोर..