नवी दिल्ली - महामारीच्या वाढत्या संकटादरम्यान काँग्रेसचे नेते राहुल गांधी सतत मोदी सरकारवर निशाणा साधत आहेत. सध्या ते विविध क्षेत्रातील मान्यवरांशी ऑनलाइन संवाद साधत असून यामार्फत देशातील परिस्थितीवर भाष्य करत आहेत. नुकतेच त्यांनी उद्योगपती राजीव बजाज यांच्याशी संवाद साधला. यावेळी लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला असून त्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण असल्याचे राजीव बजाज म्हणाले.
कोरोनासंर्भातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राहुल गांधी यांनी राजीव बजाज यांना सद्यपरिस्थितीबाबत विचारले. यावेळी, महामारीची परिस्थिती सर्वांसाठी नवीन असल्याचे बजाज म्हणाले. तसेच लोक अद्याप या परिस्थितीला अनुकूल झाले नसून याचा व्यापारावर देखील मोठ्या प्रमाणात परिणाम झाल्याचे त्यांनी सांगितले.
आजवर दुसऱ्या महायुद्धानंतर अशाप्रकारे जगाचे व्यवहार थांबले नव्हते. मात्र, सध्याचे लॉकडाऊन सर्वच गोष्टींसाठी घातक आहे. जगभरातील अनेक देशांमध्ये काही प्रमाणात घराबाहेर जाण्याची मुभा होती. मात्र आपल्या देशात अत्यंत्य कठोरपणे गोष्टी राबवण्यात आल्या. त्याचा थेट फटका उद्योगांना बसला, असे बजाज म्हणाले.