पणजी - नुकतेच इडीएममध्ये तिघांचा मृत्यू झाला आहे. परंतु, त्यांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट झालेले नाही. तर अमली पदार्थांच्या अतिसेवनाने यांचा मृत्यू झाल्याचा संशय आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करावी. तसेच राज्य सरकारमधील जे मंत्री गोव्यात अमली पदार्थ आहेत, असे म्हणतात त्यांचीही चौकशी करावी, अशा मागणीचे निवेदन गोवा प्रदेश काँग्रेसच्यावतीने गोवा पोलीस महानिरीक्षकांना देण्यात आले आहे.
हेही वाचा - 'आम्ही राजकारणापासून खूप लांब राहतो, फक्त सरकारच्या आदेशानुसार काम करतो'
इडीएममध्ये अमली पदार्थांची देवघेव होत असते, असा आरोप काँग्रेसने केला आहे. त्यामुळे हे कोठून येते, याची चौकशी होणे गरजेचे आहे. त्याबरोबरच गोव्याचे जे मंत्री आपल्याला अमली पदार्थ देवघेव करणाऱ्यांची नावे माहिती आहेत, असे म्हणातात. त्यांचीही चौकशी करावी, अशी मागणी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने केली आहे. यासाठी निवेदनासोबत वृत्तपत्रातील बातम्या समोर ठेवल्या होत्या. यावेळी काँग्रेस प्रवक्ते जनार्दन भंडारी, सरचिटणीस अमरनाथ पणजीकर, युवक काँग्रेसचे अध्यक्ष वरद म्हार्दोळकर आणि कार्यकर्ते यांचा सहभाग होता.
हेही वाचा - शोध मोहिमेदरम्यान काश्मीरमध्ये २ जवान हुतात्मा
याविषयी पोलीस महानिरीक्षक जसपाल सिंग यांना विचारले असता ते म्हणाले, आज काँग्रेस शिष्टमंडळाने निवेदन सादर करून अमली पदार्थ व्यवहारावर कारवाईची मागणी केली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीवर कारवाई होईल. सदरची कारवाई विश्वसनीय गुप्त माहितीच्या आधारे केली जाते. गोवा पोलिसांनी 2019 मध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग्ज पेडलर (अमलीपदार्थ विक्रेते ) वर कारवाई करत कोटींचा अमली पदार्थ जप्त केला आहे.