हैदराबाद - वरिष्ठ पत्रकार व रिपब्लिक हिंदी वृत्तवाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह भाष्य केल्याप्रकरणी तेलंगाणामध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. तेलंगाणा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अनिल कुमार यादव यांनी हैदराबाद येथील ओल्ड हुसेन आलम पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
महाराष्ट्रातील पालघर येथे साधूंच्या हत्येप्रकरणी सोनिया गांधी यांना उत्तर मागितल्यामुळे तक्रार दाखल केली आहे. तसेच अर्णबला त्वरित अटक करण्याची मागणीही अनिल कुमार यांनी केली. अर्णब गोस्वामी हे आरएसएस म्हणून काम करत असून ते भाजपचे कट्टर अनुयायी आहेत, असेही अनिल कुमार म्हणाले.
छत्तीसगडच्या रायपूर येथही अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. याचबरोबर बिहारमधील पाटणामध्ये प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्यकारी अध्यक्ष कौकब कादरी यांनीही अर्णब गोस्वामीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
काय प्रकरण ?
पालघर येथे जमावाकडून तिघांची हत्या करण्यात आली होती. तिघांमध्ये दोन साधूंचा समावेश होता. या हत्याकांडावर रिपब्लिक हिंदी वृत्तवाहिनीवर २१ एप्रिलला रात्री ९ वाजता 'पूछता है भारत' या डिबेट शोमध्ये चर्चा करण्यात आली. यावेळी पालघरमध्ये हिंदू साधूंची हत्या झाल्यानंतर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी या गप्प का आहेत, इतर धर्मांच्या साधूंची हत्या झाली असती तर त्या गप्पा राहिल्या असत्या का, असा प्रश्न उपस्थित करण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.