मुझफ्फरपूर - बिहारमधील मुझफ्फरपूर येथे चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग आणि चीनचे राजदूत कुई टियानकाई यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. वकील सुधीर कुमार ओझा यांनी ही तक्रार दाखल केली आहे. चीनने महासत्ता बनण्यासाठी जाणूनबुजून कोरोना विषाणू पसरवला असल्याचे त्यांनी तक्रारीमध्ये म्हटले आहे. या याचिकेवर न्यायालय सुनावणी करेल की नाही, याचा निर्णय 11 एप्रिलला घेण्यात येईल.
महासत्ता होण्यासाठी चीनने हे कोरोना विषाणूचे षडयंत्र रचले आहे. कोरोना विषाणू चीनमधील वूहानमध्ये एका लॅबमध्ये तयार करण्यात आला आहे. चीन या विषाणूचा शस्त्रासारखा वापर करत आहे. भारतामध्ये शंभर पेक्षा अधिक जण कोरोना विषाणू बाधित झाले आहेत. विषाणूमुळे अनेक लोकांचा मृत्यू व्हावा आणि देशाचे आर्थिक नुकसान व्हावे, यासाठी जाणूनबुजून चीनने कोरोना विषाणू पसरवला आहे, असे वकील सुधीर कुमार ओझा यांनी तक्रारीमध्ये म्हटले आहे.
ओडिशा, जम्मू काश्मीर, लडाख, आणि केरळमध्ये कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. देशात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 114 वर पोहचली आहे. यापैकी 14 जण बरे झाले आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्या मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी दिली आहे.