पश्चिमी चंपारण - चीनचे राष्ट्रपती आणि जागतिक आरोग्य संघटनेचे संचालक यांनी संपूर्ण जगाविरोधात कट रचत, जगात कोरोना विषाणूचा फैलाव केला आहे, असा आरोप करत बिहारच्या एका वकिलाने त्यांच्याविरोधात एक याचिका दाखल केली आहे. ही याचिका बेतिया न्यायालयाच्या मुराद अली नावाच्या वकिलांनी दाखल केली. महत्वाची बाब म्हणजे, त्यांच्या या याचिकेचा स्वीकार सीजेएम न्यायालयाने केला आहे.
काय आहे आरोप -
चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग आणि जागतिक आरोग्य संघटनेचे संचालक डॉ. टेडरॉस एथानम गँब्रेसस यांनी संपूर्ण जगाविरोधात कट रचला. त्यांनी जाणीवपूर्वक कोरोना विषाणू संपूर्ण जगात पसरवला. या विषाणूमुळे लाखो लोकांना आपले प्राण गमवावे लागले, असा आरोप मुराद अली यांनी केला आहे. त्यांनी भारतीय दंड विधान कलम 269, 270, 271, 302, 307, 500, 504 व 120 बी नुसार ही याचिका दाखल केली आहे.
अली यांच्या याचिकेवर १६ जूनला सुनावणी होणार आहे. विशेष बाब म्हणजे, मुराद अली यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांना या प्रकरणाचा साक्षीदार बनवले आहे.
दरम्यान, याआधीही चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्याविरोधात मुजफ्परपूर येथील सीजेएम न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेत जिनपिंग आणि भारतातील चीनचे राजदूत सून वेदोंग यांच्याविरोधात कोरोना विषाणू पसरवण्याचा कट रचल्याचा, आरोप करण्यात आला होता.
हेही वाचा - मदतीसाठी 'तिने' लिहिले पोलिसांना पत्र; 'खाकी' आली मदतीला धाऊन
हेही वाचा - EXCLUSIVE : 'बॉयकॉट मेड इन चायना' मोहीमेबाबत सोनम वांगचुक यांची विशेष मुलाखत..