नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज(शनिवार) कोरोना आपत्ती संबधीत संयुक्त तज्ज्ञगटाची बैठक झाली. आरोग्य आणिबाणी हाताळण्यासाठी त्यासंबधी तसेच नियोजन आणि अंमलबजावणीसाठी 11 तज्ज्ञगटांची स्थापना करण्यात आली आहे. यामध्ये आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांचादेखील समावेश आहे. देशभरामध्ये कशा प्रकारे परिस्थिती हाताळली जात आहे याचा आढावा पंतप्रधानांनी घेतला.
रुग्णालयांची उपलब्धता, विलगीकरण वार्डची सुविधा आणि इतर आवश्यक तयारीचा आढावा घेण्यात आला. 29 मार्च रोजी केंद्रीय गृहमंत्रालयाने आपत्ती निवारण कायद्याअंतर्गत 11 गटांची स्थापना केली आहे. कोरोना संकट हाताळण्यासाठी नियोजन, तयारी, आवश्यक बाबींची पुर्तता करण्यासाठी या तज्ज्ञ गटाकडून निर्णय घेतले जातात.
आरोग्य आणिबाणी संबधीत विविध जबाबदाऱ्या या तज्ज्ञ गटांकडे वाटून देण्यात आला आहे. त्यांच्या तयारीचा आढावा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला. सचिव स्तरावरील अधिकारी या गटाचा अध्यक्ष म्हणून काम पाहत आहे. धोरण आखणे, समस्यांवर प्रभावी उपाययोजना करणे, निर्णयांची अमंलबजावणी करणे ही कामे या गटांकडे आहेत. भारतामध्ये आत्तापर्यंत 2 हजार 900 कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत.