नवी दिल्ली - नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी राजधानी दिल्लीने मागील चौदा वर्षांतील थंडीचे रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. आज पहाटे राजधानी दिल्लीतील तापमान उणे १.१ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले होते. याआधी २००६ साली दिल्लीतील तापमान ०.२ अंश सेल्सिअस नोंदवले गेले होते. तो रेकॉर्ड २०२१ सालाच्या पहिल्या दिवशी मोडला आहे.
दिल्लीतील अमर पार्क, इंद्रलोक, शास्त्री नगर, आझाद मार्केट, सराई रोहिला परिसरात धुक्याची दाट चादर पसरली होती. या भागात दृश्यमानता १०० मीटरपेक्षा कमी होती.
सात जानेवारीपासून आणखी तीव्र लाट -
सध्या उत्तर भारतात कड्याक्याची थंडी पडली असून ७ जानेवारीपासून थंडीची आणखी तीव्र लाट येणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पूर्व राजस्थान, दिल्ली, उत्तर प्रदेश, पंजाब आणि हरयाणाच्या काही भागात २ ते ६ जानेवारी दरम्यान हलक्या स्वरुपाचा पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
उत्तर भारतावर दाट धुक्याची चादर -
१२ जानेवारीनंतर 'वेस्टर्न डिस्टर्बन्सेस' म्हणजेच उत्तरेकडील वाऱ्यांमुळे जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि हिमालयीन भागात बर्फवृष्टी आणि पाऊस पडेल. त्यानंतर उत्तर पश्चिम दिशेकडून थंड वारे दिल्ली, जम्मू काश्मीर आणि हिमाचल प्रदेशावर पसरतील, असे दिल्ली हवामान विभागाचे प्रमुख कुलदीप श्रीवास्तव यांनी सांगितले. दिल्ली आणि पंजाब राज्यांवर दाट धुके पसरले असून त्यामुळे दिल्लीकडे येणाऱ्या वाऱ्यांत आणखी थंडी भरत असल्याचे हवामान विभागाने सांगितले.