नवी दिल्ली - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज (शुक्रवार) राजधानी दिल्लीच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यामध्ये उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी आणि ज्येष्ठ भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांची भेट घेतली.
पंतप्रधानांची भेट झाल्यानंतर उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत या मुलाखतीबाबत माहिती दिली. 'सीएए' हा कायदा नागरिकत्व देण्याचा कायदा आहे. या कायद्याला घाबरण्याची काहीही गरज नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्ली येथे स्पष्ट केले. यावेळी खासदार संजय राऊत आणि मंत्री आदित्य ठाकरेही उपस्थित होते.
सीएए, एनपीआर, एनआरसी, जीएसटी, शेतकऱ्यांच्या अडचणी या मुद्द्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत चर्चा झाली. तसेच महाराष्ट्रातल्या इतरही प्रश्नांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा झाली असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. राज्य सरकार आणि केंद्र सरकारमध्ये कोणताही वाद नाही असेही उद्धव ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केले. राज्यपाल आणि सरकार यामध्ये वादाची ठिणगी आहे असे बोलणे हे चुकीचे आहे. किमान समान कार्यक्रमाच्या आधारावर आमचे सरकार काम करत असल्याचेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले.
यानंतर, ठाकरे यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या बैठकीसाठी काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगेही उपस्थित होते. सोनिया गांधी यांच्या भेटीनंतर ठाकरेंनी भाजपचे ज्येष्ठ नेते अडवाणी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यानंतर, त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली.
हेही वाचा : सीएएला घाबरण्याची काहीही गरज नाही, मुख्यमंत्री ठाकरेंचे मोदी भेटीनंतर स्पष्टीकरण