भोपाळ - मध्य प्रदेशमध्ये 3 नोव्हेंबर 28 जागांसाठी पोटनिवडणूक झाली. मंगळवारी झालेल्या मतदानानंतर काँग्रेस आणि भाजपा या दोन्ही पक्षांनी विजयाचा दावा केला आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी भाजपाच विजयी होणार, असा विश्वास व्यक्त केला. राज्यातील जनता भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी उभी आहे. लोकांना 15 महिन्यांत काँग्रेसचा भ्रष्टाचार दिसला. काँग्रेसने भाजप सरकारच्या सर्व योजना बंद केल्या. जनतेचा रोष काँग्रेसविरुद्ध होता. सत्तेत आल्यानंतर भाजपने सर्व विकासकामे सुरू केली. जनता भाजपच्या पाठीशी उभी आहे, असे मुख्यमंत्री शिवराज म्हणाले.
मध्य प्रदेश विधानसभेच्या 28 रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक घेण्यात आली. 230 सदस्य असलेल्या विधानसभेत 202 सदस्य आहेत. ज्यात भाजपाचे 107, काँग्रेसचे 88, बसपाचे दोन, सपाचे एक आणि चार अपक्ष आमदार आहेत. भाजपाला बहुमतासाठी फक्त 9 जागांची आवश्यकता आहे. तर काँग्रेसला पुन्हा सत्तेत येण्यासाठी सर्व 28 जागा जिंकण्याची गरज आहे. 28 जागांपैकी 25 जागा काँग्रेसच्या आमदारांच्या बंडखोरीमुळे रिक्त झाल्या आहेत. आमदारांच्या निधनाने रिक्त झालेल्या तीन जागांपैकी दोन जागा यापूर्वी काँग्रेसकडे आणि एक जागा भाजपाकडे होती. 28 जागांपैकी 16 जागा ग्वाल्हेर-चंबळ विभागातील आहेत. हा ज्योतिरादित्य सिंधिया यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. मालवा-निमाड अंचलमधील मतदारसंघात भाजपाचा प्रभाव आहे.
दहा राज्यांमध्ये पोटनिवडणुका
मध्य प्रदेशसह गुजरात, उत्तर प्रदेश, कर्नाटक, हरयाणा, ओडिशा, नागालँड, झारखंड, छत्तीसगड आणि तेलंगणा राज्यात विधानसभेच्या पोटनिवडणुका झाल्या. गुजरात 8, उत्तर प्रदेशात 7, कर्नाटक आणि ओडीशामध्ये प्रत्येकी २ जागांवर मतदान झाले. तर छत्तीसगड, तेलंगणा आणि हरयाणात प्रत्येकी एका जागेसाठी मतदान झाले.