करनाळ - फरीदाबादमधील निकिता हत्याकांडाने देशभर खळबळ माजली आहे. या प्रकरणी देशभरात विरोध प्रदर्शन होत आहेत. त्याचबरोबर या प्रकरणात लव्ह जिहादचीही चर्चा होत आहे. यूपी सरकारने लव्ह जिहाद संबंधित कायदा करण्याची घोषणा केली आहेत. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत हरियाणा सरकारही लव्ह जिहादविरोधात कारवाई करण्याच्या मार्गावर आहेत.
राज्याचे गृहमंत्री अनिल विज यांनी यूपी सरकारच्या निर्णयाचे स्वागत करताना हरियाणामध्येही लव्ह जिहादबाबत कायदा बनविण्याचे संकेत दिले आहेत. त्यांच्यानंतर आता मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनीही लव्ह जिहादबाबत कायदा बनविण्याचा विचार बोलून दाखवला आहे.
मुख्यमंत्री खट्टर यांनी म्हटले की, बल्लभगढ येथील महिलेची हत्या 'लव्ह जिहाद' शी जोडली जात आहे. त्यामुळे केंद्राबरोबरच राज्य सरकारही यावर लक्ष ठेऊन आहे व कायदेशीय बाबींवर विचार करत आहे. जेणेकरून दोषी सुटू नयेत व कोणत्याही निर्दोषाला शिक्षा होऊ नये.
त्याचबरोबर येत्या पाच नोव्हेंबर रोजी होणाऱ्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत मुख्यमंत्री खट्टर म्हणाले, की लोकशाहीत प्रत्येकाला आपली बाजू मांडण्याचा अधिकार आहे. शेतकऱ्यांनी कायदा व सुव्यवस्था कायम राखत शांततेत आंदोलन करावे.