कोलकाता (पश्चिम बंगाल) – पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जेईई आणि नीट (एनईईटी) परीक्षा ढकलावी, अशी विनंती केंद्र सरकारला केली आहे. केंद्र सरकारने धोक्याची माहिती घ्यावी आणि परीक्षा घेण्यासारखी स्थिती होईपर्यंत परीक्षा पुढे ढकलाव्यात, असे ममता बॅनर्जी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या प्रवेशासाठी जेईई आणि वैद्यकीय महाविद्यालयांच्या प्रवेशासाठी नीट परीक्षा घेण्यात येतात. या परीक्षा पुढे ढकलण्याची विनंती मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज सकाळी ट्विट करून केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या मुख्यमंत्र्यांच्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये हा प्रश्न उपस्थित केल्याचे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
सप्टेंबर अखेर परीक्षा घेण्याच्या विद्यापीठ अनुदान आयोगाच्या अनिवार्य असलेल्या मार्गदर्शक सूचनांच्या विरोधात असल्याचेही पंतप्रधानांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये सांगितले होते. या परीक्षांमुळे विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका असल्याचे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी नीट आणि जेईईच्या परीक्षा सप्टेंबर 2020 अखेर घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्याबाबत मुख्यमंत्र्यांनी ट्विट करत म्हटले, की पुन्हा केंद्र सरकारला विनंती आहे, या परीक्षा परिस्थिती सामान्य होईपर्यंत पुढे ढकलण्यात याव्यात. आपल्या सर्व विद्यार्थ्यांना सुरक्षित वातावरण देणे, हे आपले कर्तव्य आहे, असे त्यांनी दुसऱ्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
सप्टेंबरमधील नियोजित जीईई (मुख्य) आणि नीट परीक्षा ढकलण्याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली होती. विद्यार्थ्यांचे मौल्यवान वर्ष वाया घालविणे शक्य नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळताना म्हटले होते.
जेईई(मुख्य) ही परीक्षा 1 सप्टेंबर ते 6 सप्टेंबरदरम्यान नियोजित होणार आहे. तर जेईई (अडव्हान्सड) ही 27 सप्टेंबरला होणार आहे. तर नीट परीक्षा ही 13 सप्टेंबरला होणार आहे.
दरम्यान, केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने जीईई (मुख्य) आणि नीट-युजीची परीक्षा सप्टेंबरमध्ये नियोजित असल्याचे शुक्रवारी जाहीर केले आहे.