नवी दिल्ली - सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई आज( रविवारी) निवृत्त होत आहेत. 15 नोव्हेंबर (शुक्रवारी) त्यांच्या कामाचा शेवटचा दिवस होता. मागील आठवड्यात त्यांनी देशातील काही महत्त्वाच्या आणि संवेदनशील खटल्यांवर निकाल दिला.
गोगोई यांच्या कार्यकाळात अनेक महत्त्वाचे निर्णय देण्यात आले. अयोध्या जमीन वाद, शबरीमला मंदिरात महिला प्रवेश, राफेल प्रकरण अशा महत्त्वाच्या विषयांवर शेवटच्या आठवड्यात त्यांनी निकाल दिला.
शबरीमला मंदिरातील महिल्यांच्या प्रवेशाबाबतच्या खटल्यावर त्यांनी मागील आठवड्यात निकाल दिला. सर्वोच्च न्यायालयाचे कार्यालय माहिती अधिकार कायद्याच्या अंतर्गत येते हा एतिहासिक निर्णयही त्यांनी दिला. याबरोबरच सरकारी कार्यालयात ठराविक पदस्थ वगळून कोणत्याही नेत्याचे छायाचित्र लावण्यास बंदी असेल हा निर्णय त्यांनी दिला. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हिंदी आणि इंग्रजीसह ७ भांषांमध्ये देण्यात येईल हा निर्णयही त्यांच्याच कारकीर्दीत घेण्यात आला.आसामचे माजी मुख्यमंत्री केशव चंद्र गोगोई हे रंजन गोगोई यांचे वडील आहेत. गोगोई यांचा जन्म आसामधील दिब्रुगड येथे झाला आहे. दिल्लीच्या विख्यात अशा सेंट स्टिफनस् महाविद्यालयात त्यांनी इतिहास विषयात पदवी घेतली. त्यानंतर दिल्ली विद्यापीठातून त्यांनी कायद्याची पदवी घेतली. १९७८ साली त्यांनी गुवाहटी उच्च न्यायालयामध्ये काम करण्यास सुरुवात केली. एप्रिल २०१२ साली त्यांची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधिशपदी नेमणूक झाली. तर ३ ऑक्टोबर २०१८ साली सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीश पदी त्यांची नेमणूक झाली होती. त्यांनी १३ महिने सरन्यायाधीश म्हणून काम पाहिले.गोगोईंवर सरन्यायाधीश पदाच्या कार्यकाळात लैंगिक अत्याचाराचे आरोपही झाले. सर्वोच्च न्यायालयाच्या एका महिला कर्मचाऱ्याने त्यांच्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप केले होते. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने चौकशीसाठी तीन सदस्यीय समिती स्थापन केली होती. या समीतीने त्यांना 'क्लिन चीट' दिली. तसेच आसाम एनआरसी वर सार्वजनिकरित्या मत व्यक्त केल्याने त्यांच्यावर टीका झाली होती.