नवी दिल्ली- लॉकडाऊन नंतर दिल्ली मेट्रोसेवा सुरू करण्यासाठी केंद्रीय औद्योगिक पोलीस दल म्हणजेच सीआयएसएफने एक प्रस्ताव तयार केला आहे. यानुसार मेट्रो प्रवाशांची पूर्णपणे चौकशी केली जाईल. मेट्रोतून प्रवास करताना मास्क वापरणे बंधनकारक असेल, फोनमध्ये आरोग्य सेतू अॅप डाऊनलोड केलेले असावे, अशी अट ठेवण्यात आली आहे. एखाद्या प्रवाशांमध्ये तापाची लक्षणे आढळल्यास त्याला मेट्रोतून प्रवास करता येणार नाही. हा प्रस्ताव प्रवासी आणि मेट्रोचे कर्मचारी यांच्या सुरक्षिततेसाठी करण्यात आला आहे.
मेट्रो स्थानकांवर 12 हजारपेक्षा अधिक जवानांचा बंदोबस्त
सीआयएसएफच्या प्रस्तावानुसार 160 पेक्षा जास्त मेट्रो स्थानंकावर 12 हजार जवानांना तैनात करण्यात येणार आहे. प्रवासी मेट्रो स्थानकात आल्यापासून तो स्थानक सोडेपर्यंत त्याच्यावर जवान नजर ठेवतील. मेट्रो स्थानकाच्या प्रवेशद्वारावर सीआयएसएफचे जवान प्रवाशांना सॅनिटायझरने देतील, थर्मल स्क्रीनिंगद्वारे सर्वसाधारण तापमान असलेल्या व्यक्तीलाच मेट्रोतून प्रवास करण्याची परवानगी देतील. ज्याच्या शरीराचे तापमान जास्त असेल त्याला मेट्रो स्थानकावर प्रवेश देण्यात येणार नाही.
मेट्रो स्थानकावर प्रवाशांना रांग लावावी लागेल. सिक्युरिटी स्क्रीनिंग सुरू असताना प्रत्येक व्यक्तीमध्ये 2 मीटर अंतर ठेवण्यात येईल. प्रत्येक मेट्रो स्थानकावर सीआयएसफचे दोन जवान पीपीई- वैयक्तिक सुरक्षा संच परिधान केलेले असतील.
मेट्रो स्थानकावर सीआयएसएफचे जवान तैनात करण्याचा निर्णय प्रवासी, मेट्रोचे कर्मचारी, सीआयएसफचे कर्मचारी यांची सुरक्षितता लक्षात घेऊन हा प्रस्ताव बनवण्यात आला आहे. मेट्रो स्थानकावर प्रवेश करण्यापूर्वी बेल्ट आणि धातूच्या सर्व वस्तू बॅगेत ठेवाव्यात. त्यांची तपासणी बॅग स्कॅनर मशीनद्वारे करण्यात येईल.