नवी दिल्ली - लडाखच्या गलवान खोऱ्यात झालेल्या भारत-चिनी सैन्यातील संघर्षादरम्यान भारताच्या 20 जवानांना वीरमरण आले. यात बिहारच्या 5 जवानांचा समावेश आहे. हुतात्मा जवानांच्या कुटुंबीयांना सरकारी नोकऱ्या उपलब्ध करून देण्याची विनंती लोक जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष चिराग पासवान यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांना गुरुवारी केली.
लडाखच्या गलवान खोऱ्यात चिनी सैन्याशी झालेल्या झटापटीमध्ये सुनील कुमार, अमन कुमार सिंह, जय किशोर सिंह, कुंदन कुमार आणि चंदन यादव हे पाच जवान हुतात्मा झाले आहेत. कुटुंबीयातील सदस्यांना सरकारी नोकरी दिल्यास ही सैनिकांना खरी श्रद्धांजली असेल, असे पासवान म्हणाले.
आपले आणि आपल्या कुटुंबाचे, देशाचे रक्षण करण्यासाठी सैनिक आपला जीव धोक्यात घालतात. देशाचे रक्षण करताना हुतात्मा होतात. मात्र, त्यानंतर त्याच्या कुटुंबीयाला आर्थिक त्रास सहन करावा लागतो, असे पासवान यांनी पत्रात म्हटलं आहे.
सर्वोच्च बलिदान देणाऱ्या प्रत्येक सैनिकाच्या कुटुंबातील एका सदस्याला सरकारी नोकरी देण्याची जबाबदारी बिहार सरकारची आहे. सरकारने सैनिकांच्या कुटुंबीयांची काळजी घेतल्यास सिमेवर लढणाऱ्या आपल्या सैनिकांना त्यांच्या कुटुंबाच्या भवितव्याची चिंता राहणार नाही आणि शत्रूशी सामना करताना त्यांचे मनोबल उंचावेल, असे पासवान म्हणाले.
लडाखमधील गलवान खोऱ्यात सोमवारी रात्री व मंगळवारी भारत व चीनच्या सैनिकांमध्ये झटापट झाली. यात भारतीय लष्करातील २० जवानांना वीरमरण आले, तर चीनचे जवळपास ४३ जवान ठार झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.