नवी दिल्ली - बिहार विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. एनडीए आणि महागठबंधनमध्ये चुरशीची लढत पहायला मिळणार आहे. दरम्यान लोक जनशक्ती पक्षाने(एलजेपी) अद्याप निवडणूक लढण्याबाबत रणनीती जाहीर केली नाही. एलजेपी पक्षाने कोणत्याही आघाडीसोबत जाण्याचा निर्णय घेतला नाही.
केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचे पुत्र चिराग पासवान एलजेपी पक्षाचे अध्यक्ष असून निवडणुकीची धुरा त्यांच्या खांद्यावर आहे. जर चिराग पासवान यांनी एनडीएपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला तर पक्षात दरी निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पक्षातील काही असंतुष्ट नेते एनडीएसोबत जाण्याची शक्यता सुत्रांनी वर्तविली आहे.
एलजेपी पक्षाचे सहा खासदार असून त्यातील मेहबूब अली केसरी, विना देवी, पशुपती कुमार पारस आणि चंदन सिंह एनडीकडून निवडणूक लढण्यास उत्सूक असल्याचे बोलले जात आहे. जर पक्षाने एनडीएसोबत आघाडी केली नाही, तर हे नेते नितीश कुमारांच्या जनता दलमध्ये सामील होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, जेडीयूने 'ऑपरेश एलजेपी' सुरू केले असून पक्षात नाराज असलेल्या नेत्यांवर बारकाईने लक्ष ठेवून असल्याचे बोलले जात आहे.
एनडीएपासून वेगळे होऊन १४३ जागी एलजेपीचे उमेदवार जेडीयू विरोधात उभे करण्याचा मानस चिराग पासवान यांचा आहे. मात्र, त्यास पक्षातील काही खासदारांचा विरोध आहे. एनडीएपासून वेगळे होऊन एलजेपीचे काही भले होणार नाही, असे मत या चार खासदारांचे आहे.