डेहराडून - मागील काही दिवसांपासून चीनी सैनिक भारतीय सैनिकांना लिपूलेक परिसरातून लष्करी तळ हटविण्यास सांगत आहेत. हातात पोस्टर घेवून चीनी सैनिकांकडून भारतीय सैनिकांना तळ हटविण्यास सांगण्यात येत असल्याचे वृत्त समोर आले आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मागील चार दिवसांपासून चीनी सैनिक हातात पोस्टर आणि झेंडे घेवून उभे राहत आहेत. भारतीय सैनिकांनी आणि कैलाश मानसरोवर यात्रेकरूंनी तात्पुरते राहण्यासाठी उभारलेले तंबू हटविण्यास चीनी सैनिकांकडून सांगण्यात येत आहे. तंबू उभे केलेला भाग वादात असल्याचे चीनी फलकांवर लिहलेले आहे. याआधीही तीनवेळा चीनी सैनिकांनी भारतीय सैनिकांना तंबू हटविण्यास सांगितल्याचे समोर आले आहे.
सीमारेषेजवळच्या भागात भारताने बांधकाम सुरु केल्यामुळे चीनकडून भारतावर दबाव टाकण्यात येत आहे. लिपूलेक परिसराला भारताने पुलाद्वारे जोडण्याचे काम सुरू केले आहे. त्यामुळे चीनचा जळफळाट सुरु आहे. तात्पुरत्या स्वरुपात बांधलेले तळ हटविण्याची मागणी चीनकडून केली जात आहे. दोन्हीही लष्करांकडून सीमेवर गस्त वाढविण्यात आली आहे.
लिपूलेक परिसरात सीमाभागातून भारत आणि चीनमध्ये दरवर्षी 1 जूनपासून व्यापारही होत असतो. मात्र, कोरोनोच्या पार्श्वभूमीवर व्यापार थांबविण्यात आला आहे. कैलास मानसरोवर यात्राही थांबविण्यात आली आहे.