नवी दिल्ली - चीन बरोबरच्या सीमा वादानंतर काँग्रेसकडून सातत्याने पंतप्रधान मोदी आणि भाजप सरकारला लक्ष्य करण्यात येत आहे. चीनने भारताच्या भूमीवर अतिक्रमण केले नाही, ही बिजिंगची भूमिका पंतप्रधान मोदींनी उचलून धरली आहे. त्यांनी भारतीय लष्कराचा विश्वासघात केला असून त्यांच्यामुळे भारताचा चर्चेचा मुद्दाच नष्ट झाल्याचे राहुल गांधी म्हणाले.
काँग्रेस पक्षाच्या कार्यकारी बैठकीमध्ये राहुल गांधी बोलत होते. मोदी सरकारच्या काळात परराष्ट्र नीतीला संपूर्ण अपयश आल्याचे राहुल गांधी म्हणाले. पंतप्रधान मोदींनी राजनैतिक संस्थेचा डोलारा उद्ध्वस्थ केला आहे. आपल्या जुन्या मित्र देशांच्या संबंधात दुरावा आला आहे, असे नेपाळचा उल्लेख न करता राहुल गांधी म्हणाले.
भारताने अमेरिका आणि इतर देशांबरोबरचे संबध सुधारावेत, मात्र, त्याचबरोबर जुन्या मित्रांसोबतचे संबंधही जपायला हवे. चीनने आपली भूमी बळकावली आहे. मात्र, मोदींनी चीनचीच बाजू उचलून धरत भारतीय लष्कराचा विश्वासघात केला आहे. आपल्या जवानांचे बलिदान व्यर्थ न घालविण्यासाठी सर्वोतपरी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे राहुल गांधी म्हणाले.
नरेंद्र मोदी हे खरे तर 'सरेंडर मोदी'
चीन सीमा वादावरून टीका करताना राहुल गांधी यांना रविवारी नरेंद्र मोदींना सरेंडर मोदी असे संबोधले. भारत चीनमध्ये सीमावाद झाल्यानंतर सत्ताधारी भाजप पक्षाने सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर मोदींनी देशाला संबोधित केले होते. भारताच्या भूमीत कोणी अतिक्रमण केले नसून भारताची कोणतीही चौकी चीनच्या ताब्यात नाही, असे मोदी म्हणाले होते. त्यावरून काँग्रेसकडून भाजपवर टीका करण्यात येत आहे. मोदींनी चीनची बाजू उचलून धरल्याचा आरोप काँग्रेस करत आहे.