जयपूर - राजस्थान पोलिसांनी एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह रोखत दोन्ही पक्षाकडच्या कुटुंबीयांवर गुन्हा दाखल केला आहे. बनावट आधारकार्डद्वारे मुलीचे वय जास्त असल्याचे भासवण्यात आले होते. मात्र, या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत विवाह रोखला. कोटा जिल्ह्यातील मुगेना गावात ही घटना घडली.
पोलिसांनी मुलीच्या वयाबाबत अधिकृत कागदपत्रे कुटुंबीयांना मागितली असता आधार कार्ड दाखवण्यात आले. त्यामध्ये मुलीचे वय जास्त दाखवण्यात आले होते. आधार कार्डचा संशय आल्याने पोलिसांनी सत्यता पडताळून पाहिली. मुलीचे आधार कार्ड खोटे असल्याचे तपासात समोर आले.
याप्रकरणी पोलिसांनी अल्पवयीन मुलगी आणि मुलाकडच्या नातेवाईकांवर बालविवाह प्रतिबंधक कायद्याच्या कलम 11 नुसार गुन्हा दाखल केला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने एका अल्पवयीन मुलीची बालविवाहाच्या जोखडातून सुटका झाली. राजस्थानातील काही जिल्ह्यांमध्ये अजूनही बालविवाहाची कुप्रथा सुरू आहे.