उत्तराखंड - 21 तारखेला पार पडलेल्या मतदानानंतर राज्यभरात निवडणुकीच्या निकालाची उत्सुकता आहे. महाराष्ट्रात 61.27 टक्के मतदान झाल्याची नोंद करण्यात आली आहे. उद्या (दि.24 ऑक्टोबर)ला राज्यातील विधानसभेचा निकाल जाहीर होणार आहे.
जवळपास सर्वच एक्झिट पोलने भाजप-शिवसेना महायुतीला स्पष्ट बहुमत मिळणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे महायुतीचे सरकार येणार असल्याचा अंदाज बांधला जात आहे. तरीही निकाल हाती येईपर्यंत उमेदवारांचे देव पाण्यात आहेत. निकालापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक केदारनाथाचे दर्शन घेतले. बुधवारी सकाळी मुख्यमंत्री पत्नीसोबत उत्तराखंडमध्ये केदारनाथाच्या दर्शनासाठी दाखल झाले. यावेळी त्यांनी महादेवाला अभिषेक केला.
सोशल मीडियावर फोटो शेअर करून मुख्यमंत्र्यांनी यासंबंधी माहिती दिली.
मुख्यमंत्र्यांचा मोदींप्रमाणे 'केदारनाथ फॉर्म्युला'
लोकसभेचे मतदान संपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केदारनाथ देवस्थानाला भेट दिली होती. त्यावेळी पंतप्रधानांनी गुहेमध्ये ध्यानधारणा केल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी भाजपला बहुमत मिळाले. आता हाच 'केदारनाथ फॉर्म्युला' फडणवीसांनी अवलंबल्याचे दिसून येत आहे. मुख्यमंत्र्यांनी सपत्नीक महादेवाचे दर्शन घेतले. याचे फोटो त्यांनी सोशल मीडियावर टाकले आहेत. मोदींच्या फोटोप्रमाणे तेही व्हायरल झाले आहेत.