नवी दिल्ली - फूड डिलिव्हरी करणाऱ्या मुस्लीम तरुणाची सेवा नाकारणाऱ्या ग्राहकाला झोमॅटो कंपनीने जोरदार उत्तर दिले होते. झोमॅटोच्या या उत्तराचे मोठ्या प्रमाणात कौतुक केले जात असतानाच आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे.
मी आतापर्यंत झोमॅटोवरुन अन्न मागवले नव्हते. आता मात्र मी ते करणार आहे, असे ट्विट चिदंबरम यांनी केले आहे. झोमॅटोच्या एका ग्राहकाने मुस्लीम डिलिव्हरी बॉयकडून होणारी डिलिव्हरी नाकारली होती. त्याच्या तक्रारीवर उत्तर देताना झोमॅटोने स्पष्ट शब्दात ग्राहकाला नकार सुनावला होता. या प्रकरणावरुन चिदंबरम यांनी हे ट्विट केले आहे.
अन्नाला कोणताही धर्म नसतो. अन्न हाच एक धर्म आहे. आम्हाला भारताच्या विविधतेच्या संकल्पनेचा अभिमान आहे. आम्ही आमच्या तत्वांसाठी व्यावसायिक तोटा सहन करण्यास तयार आहोत, असे झोमॅटोने ग्राहकाला सुनावले होते. झोमॅटोने ट्विट केलेले हे उत्तर अनेकांनी लाईक केले असून हे ट्विट सोशल मीडियावर ट्रेंडिगमध्ये आले आहे.