जगदलपूर (छत्तीसगड) - तुम्ही टोमॅटो, हिरवी मिरची, विविध डाळींपासून तयार चटणी खाल्ली असेल. मात्र, लाल मुंग्यांच्या चटणीबाबत ऐकल्यावर आपल्याला थोडं नवल वाटेल. होय लाल मुंग्यांची चटणी हा छत्तीसगडच्या बस्तर भागातील आदिवासी लोकांच्या आहारातील एक प्रमुख घटक आहे. ही चटणी अनेक आजारांवर उपायकारक असून छत्तीसगडसह इतर राज्यातही ही चटणी विशेष प्रसिद्ध आहे. स्थानिक भाषेत याला चापडा किंवा चपोडा चटणी म्हटले जाते.
लाल मुंग्या या सहसा आंबा, कोसूम, शहारासारख्या गोड रस असणाऱ्या झाडावर सहसा घरटे बनवतात. या मुंग्या झाडाची मध्यम कोवळी पाने असलेली फांदी पाहून तिथे आपले घरटे तयार करतात. त्यांच्या तोंडातून एक प्रकारचा चिकट स्त्राव निघतो, त्याच्या चिपचिपीत पणामुळे पाने आपसात चिकटली जातात. लाल मुंग्यांना काही ठिकाणी धामोडेही म्हटले जाते.
या मुंग्या उन्हाळ्यात म्हणजे मार्च, एप्रिल ते मे महिन्याच्या काळात झाडांवर आपले घरटे बनवतात. ग्रामीण या झाडांवर चढून हे घरटे उतरवतात. काहीवेळेस झाडाखाली कापड अंथरले जाते आणि मग झाडाच्या फांद्या हलवून मुंग्या गोळा केल्या जातात आणि नंतर त्या वाळवतात. त्यानंतर मुंग्या सुपात टाकून पाखडून घेतल्या जातात. मग एका कुटनीमध्ये लाल मुंग्या, लसूण, आलं, हिरव्या मिरच्या, मीठ आणि तिखट टाकून कुटले जाते. सर्व एकजीव झाल्यानंतर ही चटणी तयार होते.
या चटणीची चव आंबट असते तसेच ती आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. लाल मुंग्यामध्ये फॉर्मिक ऍसिड, प्रोटीन आणि कॅल्शियम हे मोठ्या प्रमाणात आढळते. ताप, सर्दी, पित्त तसेच मलेरिया, कावीळसारख्या आजारांवर उपायकारक असल्याचे म्हणतात. तसेच, यामुळे रोगप्रतिकारक शक्तीही वाढते, म्हणूनच या चटणीला इतके महत्व आहे. इथले स्थानिक ताप आल्यास लाल मुंग्या असलेल्या झाडाखाली बसून उपचार म्हणून या मुंग्यांकडून स्वत:ला चावून घेतात. या प्रक्रियेने तापाचा परिणाम कमी होतो, असे मानतात. येथे येणारे पर्यटकही या चटणीची चव आवर्जून चाखतात.
ही चटणी 'बस्तरीया डीश'च्या नावाने प्रसिद्ध आहे. देश-विदेशातील पर्यटक बस्तरच्या पर्यटनावर आल्यास त्यांना ही चटणी जेवणात आवर्जून वाढली जाते. त्यामुळेच, जगदलपूर शहरातील अनेक रेस्टॉरंट आणि हॉटेल्समध्ये या चटणीला भरपूर मागणी आहे. ही चटणी इतकी प्रसिद्ध आहे, की एकदा इंग्लँडचा जगप्रसिद्ध सेलिब्रेटी शेफ गॉर्डन रामसे भारताच्या दौऱ्यावर आला असताना त्याने ही चटणी चाखली आणि तो त्याच्या प्रेमातच पडला. यानंतर त्याने आपल्या आंतरराष्ट्रीय मेनूमध्येही या चटणीला स्थान दिले आहे. रॅमसे या जगप्रसिद्ध शेफने पसंती दिल्यामुळे भारतातल्या आदिवासी समाजाचे हे खाद्यपदार्थ जगाच्या नकाशावर पोहचले आहे.