रायपूर - दक्षिण पूर्वमध्य रेल्वेने((SECR) तीन मालवाहू रेल्वे गाड्यांची एकच गाडी करत कमी वेळात दुरचे अंतर पार करण्याची ऐतिहासिक कामगिरी केली आहे. या गाडीला तब्बल 177 डबे असल्याने रेल्वेने याला 'अॅनाकोंडा फॉरमेशन'असे म्हटले. एकाच गाडीतून 15 हजार टनांपेक्षा जास्त मालाची वाहतूक पहिल्यांदाच करण्यात आली.
रेल्वेच्या या रेकॉर्ड ब्रेक कामगिरीची माहिती मंत्रालायने ट्विटरवरुन दिली. बिलासपूर रेल्वे विभागाने मोठी कामगिरी करत 3 रेल्वे गाड्या एकमेकांना जोडत 15 हजार टनापेक्षा जास्त मालाची वाहतूक केली. यामुळे प्रवासाचा वेळही वाचला. बिलासपूर ते चक्रधरपूर विभागात ही कामगिरी रेल्वेने केली, असे ट्विट मंत्रालयाने केले आहे.
एकाच वेळी 177 डब्यांची गाडी बनविण्यात आली होती. व्यस्त रेल्वे मार्गावरुन सर्व प्रवास होता. तरीही एक कोटीपेक्षा जास्त किमतीच्या मालाची वाहतूक करण्यात आली. अॅनाकोंडाच्या आकाराची रेल्वे 60 किमी प्रतितासाच्या वेगाने 2 तास 15 मिनिटांत पोहचली.
विशेष म्हणजे 3 कर्मचाऱ्यांनीच हा सर्व प्रवास केला. एक लोको पायलट आणि दोन सहाय्यक गाडीत उपस्थित होते. आव्हानात्मक काम असल्याने काही तांत्रिक अडचण येते का यावर रेल्वे विभाग लक्ष ठेवून होता. मालवाहू रेल्वे चालवण्यासाठी सामान्यपणे 3 लोको पायलट आणि तीन सहाय्यकांची गरज पडते. मात्र, तिघांनीच ही कामगिरी पार पाडली, असे रेल्वे अधिकाऱ्याने सांगितले.
हा रेल्वे मार्ग व्यस्त असल्याने सर्वसामान्यपणे अंतर कापण्यासाठी 3 तासांचा वेळ लागतो. मात्र, उपलब्ध मार्गावर जास्त वेगाने रेल्वे चालविण्यात आली. भविष्यात अशा आणखी गाड्या चालविण्याची आशा अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.