हैदराबाद - कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देशभरात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनकाळात अनेक प्राणी पक्षी मुक्तपणे रस्त्यांवर फिरताना दिसत आहेत. कुत्रा, मांजर, अशा पाळीव प्राण्यांच्या सोबतच आता तर जंगलातील प्राणी सुद्धा काही ठिकाणी रस्त्यावर दिसून येत आहेत. असाच एक चित्ता हैदराबादमधील हिमायत सागरच्या रस्त्यांवर हिंडताना दिसून आला आहे.
हा चित्ता काटेदान फार्म हाऊसमधून सुटल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. हिमायत सागर येथून चित्ता राजेंद्रनगर कृषी क्षेत्राकडे गेल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी आसपासच्या परिसरात चित्त्याचा शोध सुरू केला आहे. या घटनेने स्थानिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान स्थानिकांच्या आरडाओरडीने चित्ता पळल्याचे पोलिसांनी सांगितले. रस्त्यांवर फिरतानाचा या चित्त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.