नवी दिल्ली - कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे एकीकडे अनेक लोक चिंतेत आहेत. तर दुसरीकडे काही या परिस्थितीचा गैरफायदा घेताना दिसत आहेत. अनेकदा फेक लिंक पाठवून नागरिकांची फसवणूक केली जाते. मात्र, आता तर पंतप्रधान सहाय्यता निधीच्या नावाने बनवला गेलेला फसवा आयडी समोर आला आहे.
हा आयडी सोशल मीडियावर व्हायरलदेखील करण्यात आला आहे. जेणेकरुन नागरिक याठिकाणी पैसै दान करतील आणि ही रक्कम थेट चोरांच्या खात्यात जमा होईल. या प्रकरणी सायबर सेलने गुन्हादेखील दाखल केला आहे.
हा आहे खरा आयडी आईडी (pmcares@sbi) -
कोरोनासंदर्भात पंतप्रधान मोदींनी नागरिकांना विनंती केली होती, की या कठीण काळात देशाला आर्थिक मदत करावी. यासाठी एक यूपीआय आईडी (pmcares@sbi) जारी केला गेला. या काळात देशाची मदत करण्याची इच्छा असणाऱ्या नागरिकांनी या आयडीवर पैसे पाठवण्यास मोदींनी सांगितले होते. हे पैसे थेट पंतप्रधान सहाय्यता निधीत जाणार.
हा आहे खोटा आयडी - (pmcare@sbi)
याच परिस्थितीचा फायदा घेत काही चोरांनी या आयडीसोबत मिळता जुळता आयडी तयार केला. pmcare@sbi असा फेक आयडी होता. तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल केला गेला. जेणेकरुन अनेकांनी यात पैसे पाठवावेत. मात्र, ही गोष्ट एका व्यक्तीच्या लक्षात आली. त्याने तत्काळ दिल्ली सायबर सेलला याबद्दलची माहिती दिली.
सायबर सेलने बंद केला फेक आयडी-
माहिती मिळताच सायबर सेलने बँकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क केला आणि हा फेक यूपीआय आयडी बंद केला. यासोबतच याप्रकरणी एफआयआरदेखील दाखल करण्यात आली असून पोलीस सध्या आरोपीचा शोध घेत आहेत. तर, दान करताना बँकचे खाते आणि यूपीआय व्यवस्थित तपासून घेण्याचे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले आहे.