नवी दिल्ली - भाजप विरोधात विरोधकांचा आवाज बुलंद करण्यासाठी आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी भेटीचा सपाटा लावला आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, बसप प्रमुख मायावती, समाजवादी पक्ष प्रमुख अखिलेश यादव यांच्याशी चंद्राबाबू नायडूंनी चर्चा केली.
लोकसभा निवडणुकीचा सातवा व अंतिम टप्पा रविवारी पार पडणार आहे. २३ मे रोजी मतमोजणी झाल्यानंतर सरकार स्थापनेसाठी मताधिक्य असलेले पक्ष किंवा आघाडी आपला दावा सादर करतील. या पार्श्वभूमीवर चंद्राबाबू नायडू हे भाजप विरोधातील पक्षांच्या प्रमुखांशी चर्चा करत आहेत.
नायडू यांच्या भेटीगाठीच्या धोरणामुळे भाजप विरोधी आघाडी मजबूत होण्याची शक्यता आहे. नायडूंच्या या विनंतीला इतर पक्षाचे प्रमुख कसे प्रतिसाद देतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण? तसेच कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार यावर बऱ्याच बाबी अवलंबून असणार आहेत.