अमरावती - आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना विजयवाडा विमानतळ व्हीआयपी सुविधा नाकारण्यात आल्या. एवढेच नव्हे तर एका सुरक्षा रक्षकाकडून त्यांची विमानतळात प्रवेश करताना तपासणी करण्यात आली. त्यांना सामान्य प्रवाशांप्रमाणे वागणूक देण्यात आली आहे.
तेलगू देसम पक्षाचे अध्यक्ष तथा आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना विजयवाडा विमानतळावर अडवण्यात आले. त्यांना विमानापर्यंत पोहोचण्यासाठी व्हीआयपी वाहनाचासुद्धा वापर करू दिला गेला नाही. त्यांना सामान्य प्रवाशांच्या बसमधून विमानापर्यंत जावे लागले. राज्याच्या मुख्यमंत्री पदावार राहिलेल्या तसेच देशातील एका मुख्य पक्षाचे अध्यक्ष असलेल्या नेत्याला अशी वागणूक दिल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
यावर तेलगू देसम पक्षाद्वारे तीव्र प्रतिक्रिया देण्यात आली. भाजप आणि वायएसआर काँग्रेसचा हा डाव असून ते सूडाचे राजकारण करत असल्याचा आरोप तेलगू देसमने केला. तेलगू देसमचे नेते आणि आंध्रचे माजी गृहमंत्री चिन्ना राजप्पा म्हणाले, की विमानतळावर अधिकाऱ्यांची वागणूक अत्यंत अपमानजनक होती. एवढेच नव्हे तर त्यांनी चंद्राबाबूंच्या सुरक्षेचीही दखल घेतली नाही. चंद्राबाबूंना झेड प्लस सुरक्षा पुरवण्यात आली आहे. त्यामुळे त्यांना अशा प्रकारची वागणूक देणे गैर होते. याआधी कधीही त्यांना अशा घटनेचा सामना करावा लागला नाही.
राजप्पा यांनी राज्य आणि केंद्र सरकारचा जोरदार निषेध केला असून चंद्राबाबूंना योग्य सुरक्षा पुरवण्याची मागणी केली आहे.