अमरावती - आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि त्यांचा मुलगा लोकेश याला पोलिसांनी नजरकैदेत ठेवले आहे. तेलगू देसमच्या कार्यकर्त्यांना होणाऱ्या मारहाणी विरोधात 'चलो अतामाकुर' दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, सत्ताधारी वायएसआर काँग्रेस आणि तेलगू देसम पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद होण्याच्या शक्यतेने त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. त्यामुळे आंध्रप्रदेशातील राजकीय वातावरण पेटले आहे.
वायएसआर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून तेलगू देसम पक्षांच्या कार्यकर्त्यांना होणाऱ्या माराहणीवरून हा वाद निर्माण झाला आहे. चंद्राबाबू नायडू आणि त्यांचा मुलगा लोकेश हे दोघे अतामाकुर गावाला भेट देण्यास जाणार होते. अतामाकुर हे गुंटूर जिल्ह्यातील गाव आहे. काही दिवसांपूर्वी अतामाकुर या गावात वायएसआर काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून तेलगू देसम पक्षाच्या कार्यकर्त्यांना मारहाण झाली होती. त्यांना भेटण्यासाठी चंद्राबाबू नायडू अताकूमारला जाणार होते. मात्र, यावरुन दोन्ही पक्षांमध्ये वाद निर्माण झाला आहे.
पोलिसांनी अतामाकुर येथे संचारबंदी लागू केली आहे. तर चंद्राबाबू नायडू यांनी नजरकैदेच्या विरोधात सकाळी ८ वाजल्यापासून घरामध्येच अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना तेथे जाण्यापासून रोखले आहे.
तेलगू देसम पक्षाला 'चलो अतामाकुर' कार्यक्रमाला परवानगी देण्यात आली नव्हती. तसेच कायदा सुव्यस्था राखण्यासाठी पोलीस सज्ज असल्याचे पोलीस दलाने सांगितले आहे.