चंदीगड - कोरोना विषाणून जगभर थैमान घातले असून भारतामध्येही कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत चालली आहे. कोरोनावर मात करण्यासाठी फेस मास्कचा वापर करणे गरजेचे आहे. मात्र, काही लोक हे गांभीर्याने घेत नसल्याच्या पाहायला मिळाले आहे. यापार्श्वभूमीवर चंदीगड प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सार्वजनिक ठिकाणी फेस मास्क घातलेलं नसलेल्या व्यक्तीला अटक केली जाईल, असा आदेश चंदीगड प्रशासनाने गुरुवारी जारी आहे.
केंद्र शासित प्रदेश प्रशासनाने कोरोनाविषाणूचा प्रसार रोखण्यासाठी लोकांना सार्वजनिक ठिकाणी फेस मास्क घालणे बंधनकारक केले होते. सूचनांचे उल्लंघन केल्यास संबधित व्यक्तीवर आयपीसीच्या कलम १88 अन्वये कारवाई करण्यात येईल.
मास्क मानांकित प्रतीचे अथवा घरगुती पद्धतीने तयार केलेले असावेत. मास्क योग्य पध्दतीने स्वच्छ व निर्जंतूक करुन पुन्हा वापर करता येणारा असावा. शासकीय अधिकारी कर्मचारी यांना बैठकीस उपस्थित राहताना अथवा शासकीय वाहनाने प्रवास करताना मास्क वापरणे बंधनकारक राहील.
तोंडाला मास्क लावल्याने कोरोनाचा प्रसार थांबण्यास मोठी मदत होत आहे. त्यामुळे आता घराबाहेर निघताना मास्क लावणे अनिवार्य आहे. संचारबंदीच्या काळात अत्यावश्यक कामासाठी बाहेर येणाऱ्या प्रत्येकांने मास्क किंवा रूमाल वापरणे गरजेचे आहे.