चंदीगड - केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात काँग्रेसने 'राजभवन घेराव' आंदोलन देशभरात सुरू केले आहे. या अंतर्गत देशभरातील राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात राज्यपाल निवासस्थानी काँग्रेसने मोर्चे काढले आहे. चंदीगडमध्ये पंजाबच्या राज्यपाल निवासस्थानाला घेराव घालण्यासाठी निघालेल्या कार्यकर्त्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी पाण्याचा मारा केला. यावेळी पोलीस आणि काँग्रेस कार्यकर्त्यांत झटापट झाली.
आंदोलकांना घेतले ताब्यात -
काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यातही घेतले. पोलिसांसोबतच्या झटापटीत काही कार्यकर्ते जखमी झाल्याचीही माहिती मिळत आहे. माजी रेल्वे मंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते पवन कुमार बन्सल यांनी आंदोलात सहभाग घेतला होता. यावेळी त्यांनी ईटीव्ही भारतशी खास चर्चा केली. मागील २१ दिवसांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. केंद्र सरकारने काळे कायदे पास केले असून हे कायदे तत्काळ मागे घ्यावे, असे त्यांनी म्हटले.
काँग्रेसचा आंदोलनाला पाठिंबा -
केंद्र सरकारने पास केलेले तिन्ही कृषी कायदे रद्द करण्याची मागणी काँग्रेसने केली आहे. दिल्लीमध्ये मागील ५० दिवसांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. मात्र, आंदोलनावर कोणताही तोडगा निघाला नाही. काँग्रेस पक्षाने शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पहिल्यापासून पाठिंबा दिला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंजाब आणि हरयाणा राज्यात ट्रॅक्टर रॅली काढली होती. तसेच राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांनी भाजप सरकारवर यावरून अनेक वेळा हल्लाबोल केला आहे.
चर्चेची नववी फेरी सुरू -
दरम्यान, या आठवड्यात मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने कृषी कायद्यांना स्थगिती दिली. या कायद्यांविरोधी याचिकांवर सुनावणी करताना न्यायालयाने हे कायदे स्थगित करण्याचा निकाल दिला. यासोबतच, न्यायालयाने हा वाद सोडवण्यासाठी एका चार सदस्यीय समितीची घोषणाही केली होती. या चौघांपैकी एका सदस्याने समितीमधून माघार घेतली आहे. कित्येक शेतकरी संघटनांनी या समितीसोबत चर्चा करण्यास नकार दिला आहे. आज (शुक्रवार) केंद्र सरकार आणि आंदोलक शेतकऱ्यांत चर्चेची नववी फेरी सुरू आहे. मात्र, दुपारपर्यंत कोणताही तोडगा निघाला नसल्याची माहिती कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी दिली.