रायगड (छत्तीसगड)- छत्तीसगडच्या रायगड जिल्ह्यात स्टीलच्या प्लांटमध्ये इंधन टाकीचा स्फोट झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये चार कामगार जखमी झाले आहेत. त्यातील दोन गंभीर जखमी असल्याची माहिती पोलिसांनी गुरुवारी दिली.
रायपूरपासून सुमारे 250 किमी अंतरावर असलेल्या पाटरपली गावात जिंदल स्टील कंपनीच्या आवारात एक व्यक्ती गॅस कटरने जुन्या डिझेलची टाकी तोडत होता. त्यावेळी बुधवारी सायंकाळी हा स्फोट झाला, असे कोत्रा रोड पोलीस ठाण्याचे अधिकारी युवराज तिवारी यांनी सांगितले.
टाकीमध्ये डिझेल किंवा गॅस होता. जो गॅस कटरने कापला जात असताना ज्वालाच्या संपर्कात आला असावा त्यामुळे स्फोट झाला, असा पोलिसांचा अंदाज आहे.
या स्फोटात चार जण जळून जखमी झाले आहेत. यातील दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांना रायपूरच्या रुग्णालयात हलविण्यात आले आहे. अन्य दोघांना रायगड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. स्फोटाचे कारण शोधण्यासाठी तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.