नवी दिल्ली - दरवर्षी लाखो विद्यार्थी केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे (UPSC) घेण्यात येणाऱ्या परीक्षा देत असतात. मात्र, यावर्षी कोरोनाचा प्रसार झाल्यानंतर यूपीएससी परीक्षांचे वेळापत्रक कोलमडले. विद्यार्थ्यांच्या अभ्यासात अडथळा आला. कोरोनाची अभूतपूर्व स्थिती ध्यानात घेता २०२१ या वर्षी परीक्षार्थींना आणखी एक संधी वाढवून देण्यावर केंद्र सरकार विचार करत आहे.
कोरोनाचा अडथळा
विद्यार्थ्यांनीही एक संधी वाढवून मिळावी अशी मागणी केली होती. केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात याबाबत विचार करत असल्याचे सांगितले. यूपीएससी परीक्षा ठराविक वेळाच देता येते. कोरोनामुळे यावर्षी परीक्षा पुढे ढकलल्या गेल्या. त्यामुळे काही विद्यार्थी वयाची अट पूर्ण करू शकत नाहीत. अशा परीक्षार्थींना आणखी एक संधी देण्याबाबत विचार सुरू आहे.
परीक्षार्थींनी दाखल केली याचिका
युपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या २४ विद्यार्थ्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायमूर्ती ए. एम खानविलकर यांच्या न्यायपीठासमोर आज सुनावणी झाली. विद्यार्थ्यांना आणखी एक संधी देण्याबाबत विचार सुरू असल्याचे केंद्राने न्यायालयात सांगितले. विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी आम्ही हे प्रकरण सक्षम प्राधिकाऱ्यांकडे सोपवतो. सरकारने घेतलेल्या निर्णयाने परीक्षार्थी समाधानी नसतील तर ते पुन्हा न्यायालयात अपील करू शकतात, असे न्यायमूर्ती म्हणाले.