गुवाहाटी - आसाममधील पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी केंद्र सरकार लवकरच प्रारंभिक रक्कम म्हणून 346 कोटी रुपये जाहीर करणार आहे. ईशान्येकडील या राज्यात पूरात 56 लाख लोकांना फटका बाधित बसला आहे. बुधवारी एका अधिकृत निवेदनात ही माहिती देण्यात आली. केंद्रीय जल उर्जा मंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांनी आसामचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्यासमवेत व्हिडिओ कॉन्फरेन्सद्वारे राज्यातील पूर परिस्थितीवर सविस्तर चर्चा केली. या दरम्यान त्यांनी मुख्यमंत्र्यांना या निर्णयाची माहिती दिली.
केंद्र सरकार लवकरच पूर व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत 346 कोटी रुपयांची मदत जाहीर करेल. आसाममधील जिल्ह्यातील पूर प्रश्न सोडविण्यासाठी केंद्र सरकार भूटान सरकारसोबतदेखील चर्चा करेल. कारण, पावसाळ्यात, भूतानमधील धरणातून जास्त पाणी सोडल्यामुळे आसामच्या सर्व खालच्या जिल्ह्यांमध्ये, विशेषत: बरपेटा, नालबारी आणि कोकराझार या भागांमध्ये पूर ओढवतो, असे निवेदनात म्हटले आहे.
आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (एएसडीएमए) माहितीनुसार, यावर्षी पूर आणि भूस्खलनात 115 लोकांचा बळी गेला आहे. त्यापैकी 89 जणांचा पूर-संबंधित घटनांमध्ये मृत्यू झाला आहे तर 26 जण भूस्खलनामुळे मरण पावले आहेत. आसाममधील पूर परिस्थिती गंभीर बनली आहे. यावर्षी राज्यात एकूणच सुमारे 56 लाख लोकांना पुराचा फटका बसला आहे.