भीलवाडा - यावर्षी राजस्थानच्या भीलवाडा येथे पर्यावरण दिनाच्या निमित्ताने 'सेलीब्रेट बायोडायव्हर्सिटी' म्हणजेच 'जैवविविधता साजरी करा' या थीमद्वारे जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. याबाबत वनस्पती शास्त्र विभागाचे अध्यक्ष डॉ. बीएल जागेटिया यांनी ईटीव्ही भारतशी खास चर्चा केली. जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यामागे पर्यावरणाबाबत राजकीय आणि सामाजिक चेतना वाढविणे. तसेच पर्यावरण दिन साजरा करण्याबरोबरच ‘थिंक ग्लोबली अँड अॅक्ट लोकली’ या संकल्पनेवरही काम केले जात असल्याचे ते म्हणाले.
५ जून हा दिन जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो. जगभरातील वाढते औद्योगीकरण आणि प्रदूषणामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होऊ लागला आहे. याबाबत समाजामध्ये जनजागृती करण्याच्या दृष्टीने विविध उपक्रम राबविले जात आहेत. यातच, देशात जागतिक पर्यावरण दिन कशाप्रकारे साजरा केला जाईल, याबाबत माहिती जाणून घेण्याकरता ईटीव्ही भारतची टीम राजस्थानच्या भीलवाडा येथील माणिक्य लाल वर्मा राजकीय महाविद्यालयाच्या वनस्पती शास्त्र विभागात पोहोचली. यावेळी वनस्पती शास्त्र विभागाचे विभागध्यक्ष डॉ. बीएल जागेटिया यांनी पर्यावरण दिनानिमित्त ईटीव्ही भारतशी खास चर्चा केली.
डॉ. जागेटिया यांनी सांगितले, ५ जून १९७२ साली संयुक्त राष्ट्रसंघाच्या स्टॉक होम संमेलनात हा दिन साजरा करण्याची घोषणा करण्यात आली. त्यानंतर, ५ जून १९७४ साली पहिल्यांदा हा दिन साजरा करण्यात आला. तेव्हापासून दरवर्षी जगातील १४३ देश हा दिन पर्यावरण दिन म्हणून साजरा करतात. दरवर्षी या दिनानिमित्त वेगवेगळ्या थीमचे आयोजन करण्यात येते. यावर्षी 'सेलीब्रेट बायोडायव्हर्सिटी' म्हणजेच 'जैवविविधता साजरी करा' ही थीम ठरवण्यात आली असून त्या अनुषंगाने हा दिन साजरा करण्यात आला असल्याचे डॉ. जगेटिया म्हणाले.
गेल्या वर्षी २०१९ मध्ये 'एयर पोल्यूशन' म्हणजेच 'वायू प्रदूषण' ही थीम ठरवण्यात आली होती, तर सन २०१८ मध्ये 'प्लास्टिक पोल्यूशन' म्हणजेच 'प्लास्टिक प्रदूषण' वर आधारित थीम ठरवली गेली होती. तर, यावर्षीचा मुख्य उद्देश्य हा पर्यावरणाबाबत राजकीय आणि सामाजिक चेतना वाढविणे हा होय. तसेच, सर्व प्रकारच्या प्रदूषणासोबतच, जल संरक्षण, जैवविविधता संरक्षण आणि ग्लोबल वार्मिंगसारखे मुख्य प्रश्नही आहेत, ज्यावर उपाय शोधणे गरजेचे आहे. त्यानुसार आपण आपण "थिंक ग्लोबली अँड अॅक्ट लोकली" या संकल्पनेच्या मूळ मंत्रावर आधारित काम केले तर जगातील बिघडत चाललेल्या पर्यावरणाच्या समस्यांना आळा बसवता येईल. त्या दृष्टीने सुरुवात करायची असल्यास आपल्याला जास्तीतजास्त वृक्षारोपण करावे लागेल. तसेच, एकाच प्रकारचे वृक्ष न लावता विविध प्रकारचे वृक्ष लावणे गरजेचे आहे. कारण, या विविधतेमुळेच पर्यावरण शुद्ध व्हायला मदत मिळते, असेही डॉ. जागेटिया यांनी सांगितले.
वनस्पती शास्त्रज्ञांनी सांगितल्यानुसार, बिघडत्या पर्यावरणाला वाचवण्याकरता जास्तीत जास्त वृक्षारोपण करण्याची गरज आहे. तसेच, वाढते औद्यागिकरण आणि प्रदूषणामुळे वातावरणातील बदल आणि पर्यावरणाचा ऱ्हास टाळण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करणे गरजेचे आहे. तेव्हाच आपण या सृष्टीचे जतन करू शकू. मात्र, त्यासाठी आत्तापासूनच सुरुवात करायला हवी, विविध वृक्षांचे रोपण करुन जैवविविधतेनुसार हा दिवसच नव्हे तर संपूर्ण वर्ष साजरे करायला हवे.