नवी दिल्ली : देशाच्या हवाई दलाची ताकद वाढवणारा निर्णय आज घेण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या सुरक्षाविषयक कॅबिनेट समितीने ८३ नव्या तेजस लढाऊ विमानांच्या खरेदीस मंजूरी दिली आहे. तब्बल ४८ हजार कोटी रुपयांचा हा करार असणार आहे.
आत्मनिर्भर भारत अंतर्गत सर्वात मोठा सुरक्षा प्रकल्प..
येत्या काही दिवसांमध्ये भारत सरकार हिंदुस्तान एरोनॉटिक्ससोबत (हॅल) हा करार करणार आहे. 'आत्मनिर्भर भारत' अंतर्गत देशामध्येच या 'एलसीए-तेजस मार्क १ ए' विमानांची निर्मिती हॅल करणार आहे. संरक्षण विभागातील हा आतापर्यंतचा सर्वात मोठा स्वदेशी प्रकल्प असणार आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली.
संपूर्ण भारतीय बनावटीचे 'तेजस'..
'लाईट कॉम्बॅट एअरक्राफ्ट (एलसीए) मार्क १ ए' (तेजस) ह पूर्णपणे भारतीय बनावटीचे लढाऊ विमान आहे. या खरेदीनंतर देशातील लढाऊ विमानांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. देशातच डिझाईन केलेले, विकसीत केलेले आणि बनवलेले हे पहिलेच लढाऊ विमान ठरणार आहे. यामध्ये अॅक्टिव्ह इलेक्ट्रॉनिकली स्कॅन्ड अॅरे (एईएसए) रडार, बियॉंड व्हिजुअल रेंज (बीव्हीआर) मिसाईल, इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर (ईडब्ल्यू) सूट आणि एअर टू एअर रिफ्यूलींग (एएआर) अशा सुविधा असणार आहेत.
यासोबतच, आयएएफमार्फत पायाभूत सुविधा वाढवण्यासही मंजूरी दिली आहे. जेणेकरुन विमानांच्या बेस कॅम्पवरच त्यांची डागडुजी करणे शक्य होईल. यामुळे विमानांना दुरुस्तीसाठी इतर ठिकाणी नेण्याचा वेळ वाचेल, ज्याचा फायदा गंभीर मिशनच्या दरम्यान होईल.
हेही वाचा : केंद्राने लस मोफत दिली नाही, तर आम्ही देऊ; केजरीवाल यांचे दिल्लीकरांना आश्वासन