नवी दिल्ली - केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) 9 वी ते 12 वी पर्यंतच्या अभ्यासक्रमात 30 टक्के कपात घोषित केली आहे. त्यावरून लोकशाही जनता दलाचे नेते शरद यादव यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. अभ्यासक्रमात कपात करणे हा एकतर्फी आणि लोकशाहीविरोधी निर्णय असल्याचे ते म्हणाले.
कोरोना विषाणूच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर 2020-21 शैक्षणिक सत्रामध्ये अभ्यासक्रमात 30 टक्के कपात करण्याच्या नावाखाली काही महत्त्वाचे विषय काढण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. हे एकतर्फी आणि लोकशाहीविरोधी पाऊल आहे. मी म्हणेन की, हे देशातील लोकशाही संपुष्टात आणण्याच्या दिशेने एक पाऊल आहे, असा आरोप शरद यादव यांनी केला आहे.
दरम्यान कोरोनामुळे निर्माण झालेल्या अभूतपूर्व परिस्थितीमुळे यंदा केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) 9 वी ते 12 वी पर्यंतच्या अभ्यासक्रमात 30 टक्के कपात घोषित केली आहे. अनेकांनी या कपातीचा विरोध केला असून नाराजी व्यक्त केली आहे. सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन अभ्यासक्रमात कपात करण्यात आली आहे. ही कपात फक्त 2020 ते 21 या शैक्षणिक सत्रासाठी वैध आहे, असे केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने पत्रक जारी करून म्हटले आहे.