नवी दिल्ली- केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड (सीबीएसई) च्या 9 वी आणि 11 वीच्या परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांना पास होण्यासाठी एक संधी देण्यात येणार आहे. नापास विद्यार्थ्यांची आणखी एकदा परीक्षा घेतली जाणार असल्याचे परिपत्रक सीबीएसईने जारी केले आहे. सीबीएसई बोर्डाशी संलग्नित शाळांना विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
9 वी आणि 11वीच्या नापास विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा
कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या संकटामुळे विद्यार्थी मानसिक तणावाला सामोरे जात आहेत. शाळा बंद असल्यामुळे त्यांना अध्ययन करता नाही. रोजगार नसल्याने मुलांचे पालक चिंतेत आहेत. या सर्वांचा विचार करुन 9 वी आणि 11वीच्या नापास विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा घेण्याचा निर्णय घेतल्याचे परीक्षा नियंत्रक डॉ. संयम भारद्वाज यांनी सांगितले.
9 वी आणि 11वीच्या नापास विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा घेण्याचा निर्णय कोरोना संकटामुळे घेण्यात आला आहे. विद्यार्थी ज्या विषयांमध्ये नापास झाले आहेत त्यांची त्या विषयांची परीक्षा घेण्यात येईल. परीक्षेला सामोरे जाण्यासाठी विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ देण्यात येईल,असे सीबीएसईने सांगितले आहे. नापास विद्यार्थ्यांची परीक्षा परत घेण्याचा निर्णय या सत्रासाठीच लागू असेल. भविष्यात अशी सुविधा पुन्हा मिळणार नसल्याचे सीबीएसईने स्पष्ट केले आहे.