पाटणा - मागील काही दिवसांपासून अभिनेत्री कंगना रणौत आणि महाराष्ट्र सरकार विरोधात वाद सुरू आहे. कंगना रणौतने मुंबईबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर हा वाद पेटला. आता बिहार राज्यातील मुजफ्फरपूर जिल्ह्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. सामाजिक कार्यकर्ते राजू नैयर यांनी सीजेएम न्यायालयात गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणी १७ सप्टेंबरला सुनावणी होणार आहे. एम राजू नैयर म्हणाले की, 'महाराष्ट्र सरकार महिलांचा अपमान करत आहे. सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणात कंगना रणौत पुढे आली, तसेच ड्रग्ज पुरवठ्याची साखळी उघडी पाडण्याचं काम केल. त्यामुळे महाराष्ट्र सरकार जाणूनबुजून कंगनाला मानसिक त्रास देत आहे'.
'कंगना रणौतला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याकडून अपशब्द वापरण्यात येत आहेत. तसेच तिला जीवे मारण्याची धकमीही दिली जात आहे. कंगनाला त्रास देण्यासाठी तिच्या कार्यालयाचीही तोडफोड करण्यात आली. या सर्व गोष्टींचा राग आल्याने न्यायालयात तक्रार दाखल केल्याचे' राजू नैयर यांनी सांगितले.
अभिनेत्री कंगना रणौतने मुंबईबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर वाद निर्माण झाला आहे. कंगना रणौतने ट्विटरवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. तर कंगना मुंबईत आल्यावर शिवसेनेच्या रणरागिणी तिला सोडणार नाहीत, असे वक्तव्य शिवसेना नेत्यांनी केले होते. मुंबईतील कंगनाच्या मणिकर्णिका कार्यालयाचे बांधकाम अवैध असल्याचे म्हणत महानगरपालिकेने कारवाई केली. यात कार्यालय जेसीबीने तोडण्यात आले आहे. त्यानंतर केंद्र सरकारने कंगनाला सुरक्षाही पुरविली आहे. खासदार संजय राऊत यांनीही कंगना रणौतबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते.