पाटणा : नेपाळचे पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांच्याविरोधात बिहारमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. सितामढी येथील ठाकूर चंदन कुमार सिंह यांनी जिल्हा न्यायालयात ही तक्रार दाखल केली आहे. ओली यांनी चीनच्या प्रभावाखाली येऊन हास्यास्पद वक्तव्य केले असल्याचे त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.
ओली यांनी गेल्या आठवड्यात असा दावा केला होता, की श्रीराम यांचा जन्म भारतात नसून, नेपाळमध्ये झाला होता. रामाचा जन्म जेथे झाला ती अयोध्या भारतात नसून नेपाळमध्ये होती, आणि रामही नेपाळीच होता असे ते म्हटले होते.
यानंतर देशभरातील रामभक्तांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. भारत आणि नेपाळचे संबंध बिघडवण्यासाठीच चीनच्या प्रभावाखाली येत ओलींनी असे वक्तव्य केले आहे. तसेच, हिंदू धर्माचा अपमान करणारे हे वक्तव्य करुन भारतात अस्थिरता निर्माण करण्याचा त्यांचा डाव असल्याचेही चंदन कुमार यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.
याप्रकरणी खटला दाखल झाल्यानंतर, सीआरपीसी कायद्याच्या कलम २०० नुसार तक्रारीचे स्टेटमेंट रेकॉर्ड केले जाईल. त्यानंतर तक्रारदाराला ओलींनी असे वक्तव्य केल्याचा पुरावा न्यायालयात दाखल करावा लागणार आहे.