नवी दिल्ली - नोएडामध्ये 7 जणांविरोधात तक्रार दाखल केली आहे. यात काँग्रेस खासदार शशी थरुर, पत्रकार राजदीप सरदेसाई, मृणाल पांडे, जफर आगा, परेशनाथ, अनंतनाग आणि विनोद यांच्या नावांचा समावेश आहे. संबधित 7 जणांनी सांप्रदायिक तणाव निर्माण करणाऱया आणि भडकवणाऱ्या बातम्या प्रसारीत करून नागरिकांची दिशाभूल केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.
संबधित तक्रार नोयडामधील सेक्टर-74 मधील रहिवासी अर्पित मिश्रा यांनी दाखल केली आहे. हे संपूर्ण प्रकरण 26 जानेवरीला झालेल्या हिंसेशी संबधित आहे. याप्रकरणी कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस अधिकारी रणविजय सिंह यांनी सांगितले.
या लोकांनी जाणीवपूर्वक अशा प्रकारच्या दिशाभूल करणाऱ्या बातम्या पसरवल्या. ट्रॅक्टर चालकाला पोलिसांनी ठार मारल्याचं त्यांनी टि्वट केलं. पोलिसांनी आंदोलनकर्त्यावर गोळ्या झाडल्याची खोटी माहिती प्रसारित झाली. समुदायात दंगल आणि तणाव निर्माण करण्याच्या हेतूने जाणीवपूर्वक बातम्या प्रसारीत करण्यात आल्याचे अर्पित मिश्रा यांनी तक्रारीमध्ये म्हटलं आहे.
पोलिसांनी तक्रारीच्या आधारे 7 जणांविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. आयपीसी कलम 153a, 153b, 295a, 298,504,506, 505, 124a (sedition), 34, 120b आणि 66 आयटी अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याचं एडीसीपी रणविजय सिंह यांनी सांगितलं.